वसई–विरार महापालिका निवडणूक बंदोबस्तात जेवणावरून वादकॅटरिंग ठेकेदाराविरोधात बोळींज पोलिसांत गुन्हा दाखल

वसई–विरार महापालिका निवडणूक बंदोबस्तात जेवणावरून वाद
कॅटरिंग ठेकेदाराविरोधात बोळींज पोलिसांत गुन्हा दाखल
वसई–विरार (प्रतिनिधी) :
वसई–विरार महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य व दर्जेदार जेवण न पुरवल्याप्रकरणी कॅटरिंग ठेकेदाराविरोधात बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात संखे कॅटरर्सचे मालक सुधाकर संखे हे आरोपी असून, त्यांची नेमणूक वसई–विरार महानगरपालिकेच्या वतीने निवडणूक बंदोबस्तासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत व चांगल्या प्रतीचे जेवण पुरवण्यासाठी करण्यात आली होती. यासाठी संबंधितांमध्ये ठराविक अटी व शर्तींसह करार करण्यात आला होता.
मात्र, तक्रारीनुसार आरोपी सुधाकर संखे यांनी या कराराचे उल्लंघन करत दोन्ही वेळेस निकृष्ट व बेचव पुलाव अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरवला. त्यामुळे निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. करारात नमूद असलेल्या दर्जानुसार जेवण न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी विजय शिंदे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास बोळींज पोलीस करत आहेत.
निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या आणि तणावपूर्ण काळात ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाल्याने या घटनेची प्रशासन व कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.