आरोग्यदृष्ट्या सक्षम पालघर घडवण्याचा संकल्प; ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला गती



आरोग्यदृष्ट्या सक्षम पालघर घडवण्याचा संकल्प; ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला गती
पालघर (प्रतिनिधी)
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करत असताना जिल्ह्यातील सरपंच व ग्रामसेवकांनी ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या मोहिमेतही तितक्याच जोमाने काम करावे. आरोग्याच्या दिशेने एकत्रित प्रयत्न करत आपण आरोग्यसंपन्न पालघर जिल्हा घडवूयात,” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.
जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागामार्फत “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, हे अभियान केवळ शासकीय पातळीवर मर्यादित न राहता लोकसहभागातूनच यशस्वी होणार आहे. प्रत्येक गावाने आरोग्याच्या निकषांवर स्वतःची जबाबदारी ओळखून काम केल्यास संपूर्ण जिल्हा आरोग्यदृष्ट्या सक्षम होऊ शकतो.
या अभियानाचा कालावधी १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ असा असून, गावांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून घोषित करण्यात येईल. तसेच राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५ कोटी, ३ कोटी व २ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) व्यंकटराव हुंडेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. संतोष चौधरी यांनी प्रास्ताविक सादर करत अभियानाची उद्दिष्टे व कार्यपद्धती स्पष्ट केली.
प्रास्ताविकात मार्गदर्शन करताना डॉ. चौधरी यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होणे आणि आरोग्याबाबत जनजागृती वाढविणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. माता मृत्यू व बालमृत्यू दर कमी करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. रामदास मराड यांनी लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करत, रुग्णांना वेळेत व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर व्यंकटराव हुंडेकर यांनी महिला व बालविकास विभागाचा सक्रिय सहभाग राहणार असल्याचे नमूद करत सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेसाठी प्रत्येक तालुक्यातील पाच सरपंच, दोन आशा स्वयंसेविका, दोन समुदाय आरोग्य अधिकारी, दोन ग्रामसेवक तसेच गट विस्तार अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थित आशा स्वयंसेविका व सरपंचांनीही मनोगत व्यक्त करत अभियानासाठी सक्रिय सहभागाची ग्वाही दिली.
‘आरोग्यसंपन्न पालघर’ हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रशासन, विविध विभाग, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.