दहावी–बारावी परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियानपारदर्शक व भयमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

दहावी–बारावी परीक्षांसाठी कॉपीमुक्त अभियान
पारदर्शक व भयमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज
पालघर (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त, पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी विशेष ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत.
या अभियानाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील यांनी संयुक्तपणे शाळा प्रशासन, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध सहभागाचे आवाहन केले आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६, तर इयत्ता दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. परीक्षांदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, दक्षता पथके तसेच केंद्रस्तरीय यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात येणार आहेत.
कॉपीमुक्त अभियानांतर्गत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान काय करावे व काय करू नये याची सविस्तर माहिती देणे, पालक–विद्यार्थी सभा घेऊन शिक्षेच्या तरतुदी समजावून सांगणे तसेच अफवांपासून दूर राहण्यासाठी जनजागृती करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
“सर्व शाळा, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा यशस्वी करावी. भयमुक्त वातावरणात विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करतील, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने, चिठ्ठ्या किंवा अनधिकृत साहित्य परीक्षा केंद्रात नेऊ नये. शाळांनी आवश्यक सुविधा, शिस्त व काटेकोर पर्यवेक्षणाची अंमलबजावणी करावी, जेणेकरून परीक्षा पूर्णपणे कॉपीमुक्त होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, परीक्षा केंद्रांवर स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, योग्य प्रकाश व बैठक व्यवस्था तसेच सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी संतुलित आहार, पुरेशी झोप व मानसिक आरोग्याकडे लक्ष देत तणावमुक्तपणे परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
परीक्षांबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.