आदिवासी भागातील माता-बाल मृत्यू रोखण्यासाठी जिल्हास्तरीय गाभा समिती सभा संपन्न


आदिवासी भागातील माता-बाल मृत्यू रोखण्यासाठी जिल्हास्तरीय गाभा समिती सभा संपन्न
पालघर (प्रतिनिधी) : आदिवासी भागातील माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्हास्तरीय गाभा समितीची महत्त्वपूर्ण सभा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत माता-बाल आरोग्याच्या विविध उपाययोजनांचा सखोल आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, आर.एम.ओ. डॉ. योगेश सुराळकर, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. वैदेही माळवी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन वाघमारे तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
सभेत माता मृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी, उच्चजोखमीच्या गर्भवतींचे वेळेवर निदान, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, नवजात बालकांची विशेष काळजी (SNCU) आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा झाली.
सन २०२४-२५ मध्ये माता-बाल संगोपन अंतर्गत प्रभावी कामगिरी करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पालघर जिल्ह्यातील SNCU विभाग उत्तम कार्यरत असून राज्यात दुसरा क्रमांक जव्हार येथील SNCU केंद्राने पटकावल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी दिली.
तसेच राज्यात सर्वाधिक प्रसूती करणारे प्रथम क्रमांकाचे प्राथमिक आरोग्य केंद्र सायवन (ता. डहाणू) यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीत पालघर जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर असल्याचा अभिमानास्पद उल्लेखही यावेळी करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक करत आदिवासी भागातील माता-बाल आरोग्य सेवांमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण व संवेदनशील काम करण्याच्या सूचना दिल्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.