Uncategorized

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” कार्यशाळा ग्लोबल कोकण महोत्सवात संपन्न

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” कार्यशाळा ग्लोबल कोकण महोत्सवात संपन्न.


पालघर (प्रतिनिधी):
मा. विकास आयुक्त (उद्योग) श्री. दिपेंद्र सिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली व मा. जिल्हाधिकारी, पालघर डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली “महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” ही कार्यशाळा ग्लोबल कोकण महोत्सव, शिरगाव बीच (पालघर) येथे उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाला मा. अप्पर जिल्हाधिकारी श्री. भाऊसाहेब फटांगरे, मा. उपविभागीय अधिकारी, डहाणू श्री. विशाल खत्री (भा.प्र.से.) तसेच सहसंचालक, उद्योग, कोकण विभाग श्रीमती विजू सिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
अप्पर जिल्हाधिकारी श्री. भाऊसाहेब फटांगरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, येणाऱ्या काळात विविध प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असून किनारी, डोंगरी व नागरी भागांचा सर्वांगीण विकास होणार आहे. युवकांनी नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपविभागीय अधिकारी श्री. विशाल खत्री यांनी उद्योजकांना आवश्यक सर्व मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर असल्याचे आश्वासन दिले. विशेषतः आदिवासी भागातील सुशिक्षित युवक-युवतींनी उद्योग क्षेत्राकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले.
सहसंचालक श्रीमती विजू सिरसाठ यांनी प्रास्ताविकात सांगितले की, पालघर जिल्ह्याचा राज्याच्या निर्यातीतील वाटा सातत्याने वाढत असून मागील वर्षी सुमारे रु. ३०,१३८ कोटींची निर्यात झाली आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) अंतर्गत चिकू व सागरी उत्पादनांना विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे. नवउद्योजकांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेऊन उद्योग सुरू करावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत विदेश व्यापार विकास अधिकारी (DGFT) श्री. प्रमोद थावरे यांनी निर्यातीसाठी आवश्यक परवाने व योजनांची माहिती दिली. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गेनाइजेशन्स (FIEO) च्या वरिष्ठ कार्यकारी श्रीमती रिशु वर्मा यांनी निर्यात प्रक्रियेत घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीचे वरिष्ठ व्यवसाय व्यवस्थापक श्री. अनिल जाधव यांनी विविध विमा योजनांची माहिती दिली. आयडीबीआय कॅपिटलचे सहाय्यक व्यवस्थापक श्री. उमेश रनोलिया यांनी अनुसूचित जाती-जमाती उद्योजकांसाठी अर्थसहाय्य योजनांवर प्रकाश टाकला.
अभिनव इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक श्री. अफान हैदर यांनी ‘स्किल इंडिया’ अंतर्गत अप्रेंटिसशिप योजनेचे सादरीकरण केले. ‘मैत्री’चे नोडल अधिकारी श्री. विजय शिंदे यांनी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ संदर्भातील सुधारणा व मैत्री कायद्याची माहिती दिली. वास्तुविशारद श्री. योगेश म्हात्रे यांनी होमस्टे, रिसॉर्ट व हॉटेल्ससाठी आवश्यक बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया स्पष्ट केली. ‘करिअर रेजर’च्या संस्थापिका श्रीमती दिपा राऊत यांनी RAMP व IDEMI प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. उपेंद्र सांगळे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या उद्योग योजनांचे मार्गदर्शन केले.
यानंतर प्रश्नोत्तर सत्रात उपस्थित उद्योजकांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी श्री. धम्मपाल थोरात यांनी केले तर शेवटी व्यवस्थापक श्री. उद्धव माने यांनी आभार मानले.
यावेळी ग्लोबल कोकण महोत्सवात ‘ODOP’ अंतर्गत चिकू उत्पादने तसेच तारापूर येथील उद्योगांची दालने प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उद्योग केंद्र, रोटरी क्लब ऑफ विरार, एमसीईडी व मिटकॉन यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button