परुळेकर महाविद्यालयात महिला अत्याचार प्रतिबंधाबाबत जनजागृती“शिक्षण हेच महिलांच्या प्रगतीचे तसेच सशक्तीकरणाचे साधन आहे” – प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत


परुळेकर महाविद्यालयात महिला अत्याचार प्रतिबंधाबाबत जनजागृती
“शिक्षण हेच महिलांच्या प्रगतीचे तसेच सशक्तीकरणाचे साधन आहे” – प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत
तलासरी : (प्रतिनिधी)आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला विकास कक्षाच्या वतीने “महिला लैंगिक अत्याचार” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
कार्यक्रमास तलासरी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक योगिता गुजर या प्रमुख पाहुण्या म्हणून, तर मुख्य हवालदार विना काकड या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि कॉम्रेड लहानू कोम यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य व सहाय्यक प्राध्यापक प्रा. निलेश साळवे यांनी केले. त्यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेत विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल माहिती दिली.
प्रमुख पाहुण्या पोलीस उपनिरीक्षक योगिता गुजर यांनी आदिवासी भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार व अन्यायाच्या घटनांवर प्रकाश टाकत अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी महिलांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांविषयी माहिती देत त्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी प्रोत्साहित केले.
यानंतर सहाय्यक प्राध्यापक भास्कर गोतीस यांनी विद्यार्थ्यांना स्त्री शिक्षण आणि स्त्री सशक्तीकरणाविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी विद्यार्थिनींनी स्वतःचे सामर्थ्य ओळखून कठोर परिश्रमांच्या जोरावर यश संपादन करावे, असे सांगितले. “शिक्षण हेच स्त्री सशक्तीकरणाचे व प्रगतीचे खरे साधन आहे,” असे त्यांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. होन, सहाय्यक प्राध्यापक प्रा. भास्कर गोतीस तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाला महाविद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका दिपाली भापकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नम्रता चौधरी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला विकास कक्षातील सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.