Uncategorized

दानशूर करंदीकर कुटुंबीयांचा पुढाकारदांडेकर महाविद्यालयात विस्तारित विधी इमारतीचे भूमिपूजन संपन्न

दानशूर करंदीकर कुटुंबीयांचा पुढाकार
दांडेकर महाविद्यालयात विस्तारित विधी इमारतीचे भूमिपूजन संपन्न


पालघर (प्रतिनिधी)पालघर येथील सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी अंतर्गत संचलित “आत्माराम जनार्दन करंदीकर विधी महाविद्यालय” तसेच वासुदेव आत्माराम करंदीकर पदव्युत्तर अध्ययन केंद्राच्या विस्तारित नव्या इमारतीचे भूमिपूजन रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी पारंपरिक विधी-विधानानुसार पूजा-अर्चना करून उत्साहात संपन्न झाले.
दानशूर कुटुंबीय ॲड. प्रकाश वासुदेव करंदीकर, अजित वासुदेव करंदीकर, सौ. शुभांगी प्रकाश करंदीकर, शिशिर अजित करंदीकर आणि सौ. पूजा करंदीकर यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. या प्रसंगी दानशुर करंदीकर कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष, सी.ए. सचिन कोरे यांनी नव्या विस्तारित विधी इमारतीसाठी दिलेल्या भरघोस आर्थिक सहकार्याबद्दल दानशुर करंदीकर कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानले. शिक्षण क्षेत्रासाठी करंदीकर कुटुंबीयांनी केलेले हे भरघोस आर्थिक योगदान अत्यंत प्रेरणादायी असून यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणार असल्याचे श्री. सचिन कोरे यांनी नमूद केले. नव्या विस्तारित इमारतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच आधुनिक व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत आणि परिसरातील विधी शिक्षणाला नवी दिशा व बळ मिळणार असून अनेक विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडविण्याची चांगली संधी उपलब्ध होईल, असेही सचिन कोरे यांनी सांगितले.
दानशूर करंदीकर कुटुंबीयांच्या वतीने ॲड. प्रकाश करंदीकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी ही संस्था मागील अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. समाजातील सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि विशेषतः विधी शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक चांगली संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने करंदीकर कुटुंबीयांनी नव्या विस्तारित विधी इमारतीच्या बांधकामासाठी आर्थिक योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा, संस्थेचे विश्वस्त सोहनभाई बाफना, उपाध्यक्ष धनेशभाई वर्तक, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी व अनिल पाटील, प्रकाश संखे (अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती) यांच्यासह अतुल दांडेकर, चंद्रकांत तिवारी, सुरेश जोशी, अमिता राऊत, हेमाळी राऊत, हितेंद्र शहा, सुधीर दांडेकर, भरत राऊत, योगेश म्हात्रे, दिनेश पाटील, रामप्रकाश निराला तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनंत पाटील उपस्थित होते. याशिवाय परिसरातील ज्येष्ठ वकील ॲड. दीपक सावले व ॲड. सुधीर गुप्ता, अनेक समाजसेवक तसेच मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साह आणि सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात हा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button