Uncategorized

याला जबाबदार कोण? बाहेरील लोंढे नियंत्रित होणे गरजेचे

याला जबाबदार कोण? बाहेरील लोंढे नियंत्रित होणे गरजेचे
मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)
बारावीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाने घाला घातला. डोंबिवलीतील सोहम सचिन कटरे या विद्यार्थ्याचा लोकल रेल्वेमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन सोहम खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोहम डोंबिवली येथे राहत होता आणि कळव्यातील मनिषा विद्यालय येथे त्याचे परीक्षा केंद्र होते. बारावीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने रेल्वेतील असह्य गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दररोज मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची अमर्याद गर्दी होत आहे. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे डब्यांची संख्या १२, १५ किंवा १८ करण्याचे उपाय सुचवले जात असले, तरी हे उपाय अपुरे ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. कारण प्रश्न केवळ डब्यांचा नसून, मुंबई आणि उपनगरांवर वाढत चाललेल्या लोकसंख्येचा आहे.
स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की, रोज रोज वाढणाऱ्या राज्याबाहेरील परप्रांतीय लोंढ्यांना याला जबाबदार कोण? जोपर्यंत राज्याच्या बाहेरून येणारे स्थलांतरित लोंढे नियंत्रित होणार नाहीत, तोपर्यंत स्थानिक नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अशा दुर्घटनांना सामोरे जावे लागणार, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
राज्याच्या पायाभूत सुविधा, विशेषतः रेल्वे व्यवस्था, आधीच ताणाखाली आहे. अशा परिस्थितीत अनियंत्रित स्थलांतरामुळे गर्दी अधिक वाढत असून अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून स्थलांतरितांबाबत ठोस आणि कडक कायदा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
सोहम कटरेच्या मृत्यूने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. ही घटना केवळ अपघात न मानता, व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतीक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button