Uncategorized

मुलुंड रेल्वे (प.) स्थानकाजवळ ६१ बेकायदेशीर दुकाने हटवलीसुमारे १,१०० चौ.मी. अतिक्रमणावर कारवाई; पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा

मुलुंड रेल्वे (प.) स्थानकाजवळ ६१ बेकायदेशीर दुकाने हटवली
सुमारे १,१०० चौ.मी. अतिक्रमणावर कारवाई; पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा
मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठी कारवाई करत मुलुंड (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळील सरदार वल्लभभाई पटेल रोडवरील ६१ बेकायदेशीर दुकाने व स्टॉल्स हटवले. या मोहिमेत सुमारे १,१०० चौरस मीटर क्षेत्रफळावरील अतिक्रमण हटवण्यात आले असून परिसर पादचाऱ्यांसाठी मोकळा करण्यात आला आहे.
ही कारवाई टी-वॉर्ड अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात पार पडली. यासाठी ४ जेसीबी आणि ७ डंपर यांचा वापर करण्यात आला. मुलुंड स्टेशन (पश्चिम) परिसरातील बेकायदेशीर स्टॉल्स व फेरीवाल्यांमुळे अनेक वर्षे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. वाहनधारक आणि नागरिकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता.
या प्रकरणी संबंधित दुकानदारांविरुद्ध रेल्वे आणि पालिका न्यायालयात अनेक वर्षे खटले सुरू होते. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर संबंधितांना नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणे अतिक्रमणमुक्त ठेवणे आणि वाहतूक सुरळीत करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अनधिकृत बांधकामांविरुद्धची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे.
या कारवाईमुळे मुलुंड (प.) स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button