गोदावरी परुळेकर महाविद्यालयात पदवी, पारितोषिक व ‘गोदावरी’ अंक प्रकाशनाचा त्रिवेणी सोहळा संपन्न.


गोदावरी परुळेकर महाविद्यालयात पदवी, पारितोषिक व ‘गोदावरी’ अंक प्रकाशनाचा त्रिवेणी सोहळा संपन्न
तलासरी, दि. २८ मार्च २०२६ :
आदिवासी प्रगती मंडळ संचालित, कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथे पदवी वितरण, वार्षिक पारितोषिक वितरण व ‘गोदावरी’ या वार्षिक अंकाच्या प्रकाशनाचा त्रिवेणी सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमास आदिवासी प्रगती मंडळाच्या अध्यक्षा मा. हेमलता कोम, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मा. अजितदादा नार्वेकर, मा. सुहास सुरती, नगराध्यक्ष मा. सुरेश भोये तसेच मा. विजय खुलात यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणून उद्योजक मा. मोहनभाई पटेल व तलासरीचे तहसीलदार मा. अमोल पाठक उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पालघरचे उपजिल्हाधिकारी मा. रवींद्रसिंग राजपूत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी शामराव परुळेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग केवळ अर्थार्जनासाठी नव्हे, तर समाज व राष्ट्र उन्नतीसाठी करावा, तसेच गोदावरी परुळेकरांच्या कार्याचा वारसा आपण सातत्याने जपण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
यानंतर ‘गोदावरी’ या वार्षिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मा. मोहनभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांना विविध संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले, तर मा. अमोल पाठक यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याचा संदेश दिला. प्रमुख अतिथी मा. रवींद्रसिंग राजपूत यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांना प्रेरक गोष्ट सांगून यथोचित मार्गदर्शन केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच प्रत्येक शाखेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय राष्ट्रीय सेवा योजना, मराठी व राज्यशास्त्र विभाग, क्रीडा, सांस्कृतिक आणि ग्रंथालय विभागात विशेष कामगिरी करणाऱ्या १८० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष मा. सुरेश भोये यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो, असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सहा. प्रा. वाकडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहा. प्रा. सुजाता गावित यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.