२० दिवसांच्या बाळंत मातेचा दुर्दैवी मृत्यू; दोन लहान मुलांवर मातृहस्ताचा आधार हिरावला.

२० दिवसांच्या बाळंत मातेचा दुर्दैवी मृत्यू; दोन लहान मुलांवर मातृहस्ताचा आधार हिरावला.
डहाणू /प्रसाद भालेराव.
विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुक (भोयेपाडा) येथील ३१ वर्षीय माता मीना महेंद्र राऊत यांचा दिनांक १९ फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
माहितीनुसार, मीना राऊत या दुपारच्या सुमारास नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या असता त्यांना अचानक खोकला व उलट्यांचा त्रास सुरू झाला. प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या पती महेंद्र राऊत यांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा येथे उपचारासाठी दाखल केले.मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय कासा येथे संदर्भित केले. खाजगी वाहनाचा आधार घेत पीडित महिला रुग्ण व तिचा पती आणि नातेवाईक यांच्या मदतीने कासा येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टर अथवा कोणताही वैद्यकीय कर्मचारी रुग्णांसोबत नव्हता.अशी माहिती समोर आली आहे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मीना राऊत या केवळ २० दिवसांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालय कासा
येथे बाळंत झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात ५ वर्षांचा मुलगा आणि केवळ २० दिवसांचे अर्भक असा परिवार आहे. कुटुंबातील प्रमुख आधारस्तंभ हरपल्याने राऊत कुटुंबाचा संसार अक्षरशः उघड्यावर पडला आहे.
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, कुटुंबाला शासकीय मदत व वैद्यकीय चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे आदिवासी ग्रामीण भागातील मातांसाठी तातडीच्या आणि सक्षम आरोग्य सुविधांची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.