कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधीसोनोपंत दांडेकर महाविद्यालयात महारोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन



कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात महारोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन
पालघर (प्रतिनिधी) –
कौशल्य प्राप्त केल्यास तरुणांना रोजगार मिळविणे अवघड नाही, असे प्रतिपादन कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII) कांदिवली येथील सेंटरचे प्रमुख श्री. दयाळ कांगणे यांनी केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय व कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या महारोजगार मेळाव्यामध्ये सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ तसेच पालघर परिसरातील इतर महाविद्यालयांतील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या मेळाव्यासाठी तब्बल १७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष मेळाव्यात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या रोजगार मेळाव्यात ३० नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये सुमारे ४६४५ नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यापैकी १२४ विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड करण्यात आली, तर ३६७ विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड झाली असून १३७ विद्यार्थ्यांना कौशल्य विकास (Skill Development) करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप, स्वयंरोजगार व विविध करिअर संधींबाबत माहिती घेतली. ॲमेझॉन, बजाज, आयटीसी, एचडीएफसी यांसारख्या नामांकित कंपन्यांचा या मेळाव्यास उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बदलत्या काळात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यांचा योग्य वापर करून रोजगाराच्या संधी प्राप्त कराव्यात.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रामीण विकास केंद्राचे संचालक डॉ. कैलास मोरे, तसेच मुक्त विद्यापीठाचे मुंबई विभागीय संचालक श्री. वामन नाखले उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शंकरा हिंदू मिशन, माटुंगा येथील श्री. हरी कलपते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विशेष सहभाग होता.
सीआयआयकडून श्री. दयाळ कांगणे, निलेश धनावडे, गौरांग खाड्ये, सिद्धेश राजपूत, रवी कुमारिया, गौरव मणियार, राजेश वासमवार, मानसी चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष योगदान दिले.