Uncategorized

डहाणू लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवासी नाराज१ फेब्रुवारीपासून ४ नवीन सेवा; डहाणू मार्गाकडे मात्र दुर्लक्ष

डहाणू लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवासी नाराज
१ फेब्रुवारीपासून ४ नवीन सेवा; डहाणू मार्गाकडे मात्र दुर्लक्ष


पालघर / डहाणू | दि. ३१ जानेवारी २०२६
१ फेब्रुवारी २०२६ पासून पश्चिम रेल्वेने (WR) विरार–चर्चगेट मार्गावर अप व डाउन दिशेने प्रत्येकी दोन अशा एकूण चार नवीन लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चर्चगेट–विरार या ६० किलोमीटर लांबीच्या मार्गावरील प्रवासी वहन क्षमतेत दररोज सुमारे ३० ते ४० हजार प्रवाशांची वाढ होणार आहे. मात्र, या नवीन सेवांमध्ये विरार–डहाणू मार्गावरील एकाही लोकल फेरीचा समावेश नसल्याने या मार्गावरील प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
विरार–डहाणू मार्गावरील प्रवासी संघटनांनी हा निर्णय म्हणजे डहाणू पट्ट्यातील प्रवाशांवर रेल्वेकडून होत असलेली सावत्र वागणूक असल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील दैनंदिन प्रवाशांची संख्या १.२५ लाखांहून अधिक झाली असताना देखील आवश्यक त्या प्रमाणात लोकल सेवा वाढवण्यात आलेल्या नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सहसचिव प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी सांगितले की,
“आम्ही पश्चिम रेल्वे प्रशासनाला लेखी पत्र देऊन विरार–डहाणू मार्गावर अधिक लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. किमान गर्दीच्या वेळेत धावणाऱ्या १२ डब्यांच्या लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्यात याव्यात, अशीही आमची ठाम मागणी आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.”
सध्या पश्चिम रेल्वे विरार–डहाणू मार्गावर लोकल व शटल गाड्यांसह ६० हून अधिक सेवा चालवत असली, तरी वाढती लोकसंख्या, रोजगारासाठी मुंबईकडे होणारा प्रवास आणि अपुरी सेवा यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, १ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार नवीन नॉन-एसी १२ डब्यांच्या लोकलपैकी दोन सेवा भाईंदर–वांद्रे तर उर्वरित दोन सेवा भाईंदर–चर्चगेट दरम्यान धावणार आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागातील एकूण लोकल सेवांची संख्या १,४०६ वरून १,४१० इतकी होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कांदिवली–बोरिवली दरम्यान सहावा मार्ग कार्यान्वित झाल्यामुळे परिचालन क्षमतेत सुधारणा झाली असून, एप्रिल २०२६ मध्ये सुधारित वेळापत्रक लागू झाल्यानंतर ८ ते १२ अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यापैकी काही सेवा विरार किंवा थेट डहाणूपर्यंत वाढवण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.
मात्र, प्रत्यक्षात निर्णय होईपर्यंत विरार–डहाणू मार्गावरील प्रवाशांची प्रतीक्षा कायम असून, डहाणू लोकल सेवा वाढवण्याची ठोस घोषणा तातडीने करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button