घरफोडी प्रकरण उघड — सराईत चोर अटकेत; सोन्याचे दागिने जप्त

घरफोडी प्रकरण उघड — सराईत चोर अटकेत; सोन्याचे दागिने जप्त
पालघर, (प्रतिनिधी)दि. 28 फेब्रुवारी — पालघर पोलिसांनी घरफोडी प्रकरणाचा यशस्वी छडा लावत सराईत आरोपीला अटक करून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारी 2026 रोजी सुचितकुमार वैकुंठ वर्मा (वय 51) यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे 1,94,500 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस नेले होते. या प्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे रोहित कान्हुभाई सोलंकी उर्फ रोहित चेतन शेठी (वय 25, रा. नालासोपारा पूर्व) याला अटक केली.
तपासादरम्यान आरोपीकडून सुमारे 1,49,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नवी मुंबई आदी ठिकाणी एकूण 47 गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे व संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.