Uncategorized

बोईसर MIDC : अवजड वाहनांचे दोन–तीन दिवसांचे ‘स्थिर पार्किंग’ कायम — अपघातांच्या मालिकेमुळे RTO व वाहतूक विभागावर कारवाईची मागणी तीव्र

बोईसर MIDC : अवजड वाहनांचे दोन–तीन दिवसांचे ‘स्थिर पार्किंग’ कायम — अपघातांच्या मालिकेमुळे RTO व वाहतूक विभागावर कारवाईची मागणी तीव्र

बोईसर :(प्रतिनिधी)
विराज प्रोफाईल ते टाटा कंपनी या महत्त्वाच्या औद्योगिक मार्गावर अवजड वाहनांची अनियंत्रित पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, अनेक वाहने दोन–तीन दिवस जागेवरच उभी राहतात. कंपन्यांमध्ये माल उतरण्यास विलंब होत असल्याने ट्रक-ट्रेलर रस्त्याच्या दुतर्फा अडवून उभे राहतात.
मूळत: ही वाहने संबंधित कंपन्यांच्या प्रीमिसेसमध्येच उभी राहायला हवीत, मात्र अनेक कंपन्या जबाबदारी झटकून रस्ता मोकळा ‘पार्किंग झोन’सारखा वापरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या अतिक्रमणामुळे हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे. काही काळापूर्वी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालेला अपघात तसेच अनेक किरकोळ–गंभीर दुर्घटना याच अनधिकृत पार्किंगमुळे झाल्या असल्याचे सांगितले जाते.
स्थानिक नागरिक, कामगार तसेच प्रवासी यांचा एकच सूर
“RTO व बोईसर वाहतूक विभागाने तात्काळ कारवाई करावी; रस्त्यावरील स्थिर पार्किंग संपूर्णपणे हटवावे.”
नागरिकांचे म्हणणे आहे की,
वाहनं दोन–तीन दिवस उभी राहणे म्हणजे स्पष्ट वाहतूक नियमभंग,
रस्त्याच्या रुंदीचा मोठा भाग व्यापला जात असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांना धोका,
रात्रीच्या वेळी दृष्टीआड झालेली मोठी वाहने प्राणघातक ठरू शकतात.
औद्योगिक वाहतुकीचा भार वाढत असताना बोईसर MIDC मधील या मार्गावर शिस्तबद्ध पार्किंग, कटाक्षाने अंमलबजावणी आणि कंपन्यांना त्यांच्या परिसरात वाहन ठेवण्यास भाग पाडणे या तातडीच्या उपाययोजना न केल्यास अपघातांची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button