Uncategorized

राज्यस्तरीय आयटीआय पारितोषिक सोहळा : वाणगाव आयटीआयचा राज्यात मानाचा तुरा

राज्यस्तरीय आयटीआय पारितोषिक सोहळा : वाणगाव आयटीआयचा राज्यात मानाचा तुरा


मुंबई,(प्रतिनिधी )दि. १० एप्रिल २०२६ : राज्यातील कौशल्य विकास क्षेत्रात अभिमानाची नोंद करत औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) वाणगाव, ता. डहाणू, जि. पालघर यांनी राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शन Dipex मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील शासकीय तांत्रिक प्रशाला येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक मा. सतीश सूर्यवंशी यांनी करत राज्यातील आयटीआय संस्थांची प्रगती आणि कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. या सोहळ्यास अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा, डॉ. अपूर्वा पालकर, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे कुलगुरू, एमएसएसडीएसचे सीईओ अमित सैनी यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
सदर पारितोषिक संस्थेचे प्राचार्य सचिन प. संखे, शिल्पनिदेशक प्रशांत वडार आणि प्रशिक्षणार्थी यांच्या हस्ते स्वीकारण्यात आले. यावेळी मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या भाषणात आयटीआय संस्थांची कौशल्य विकासातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव आवश्यक असल्याचे नमूद केले.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या पद्मश्री जिव्या सोमा मशे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगाव यांनी मर्यादित साधनसामग्री, भौगोलिक अडचणी असूनही गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, उद्योगाभिमुख उपक्रम आणि उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
ग्रामीण भागातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्याचे मोलाचे कार्य संस्था सातत्याने करत आहे. या यशामुळे “ग्रामीण भागातूनही उत्कृष्टतेकडे वाटचाल शक्य आहे” हा सकारात्मक संदेश राज्यभर पोहोचला असून, इतर आयटीआय संस्थांसाठीही हा आदर्श ठरणार आहे.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे आयटीआय वाणगावने राज्याच्या कौशल्य विकास क्षेत्रात आपला ठसा उमटवत संपूर्ण पालघर जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button