एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय कासा; प्रशासकीय उदासीनतेचा बळी

तब्बल १८ वर्षापासून दुरावस्थेत, कर्मचाऱ्यांवर हालअपेष्टा
एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय कासा; प्रशासकीय उदासीनतेचा बळी
तब्बल १८ वर्षापासून दुरावस्थेत, कर्मचाऱ्यांवर हालअपेष्टा

डहाणू/प्रसाद भालेराव
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी,माता- बाल आरोग्यासाठी तसेच पोषण आहार,अंगणवाडी केंद्राचे नियोजन अशा महत्त्वपूर्ण योजना राबवण्याकरिता शासनाने डहाणू तालुक्यातील कासा येथे सन २६ जानेवारी २००८ रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नवीन बालविकास प्रकल्प कार्यालय कासा येथे सुरु करण्यात आले.या कार्यालयास एकूण १० पदे मंजूर असून यामध्ये विस्तार अधिकारी-१, मुख्य सेविका- ४, कनिष्ठ सहाय्यक-१तर शिपाई-१ अशी एकूण ७ पदे भरली गेली आहेत.तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी-१, मुख्य सेविका-२ ही महत्त्वाची ३ पदे अद्यापही भरली नसून ती रिक्त आहेत.

सध्या या कार्यालयास १८ वर्ष पूर्ण झाले असून ते अतिशय दुरावस्थेत आहे. या कार्यालयाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कर्मचाऱ्यांना अत्यंत गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.कार्यालयातील एकाच खोलीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसून कर्तव्य बजावावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे सदर कार्यालयाकडून वरिष्ठ पातळीवर नवीन इमारत बांधणे,कार्यालय सुधारणा अथवा डाग-डुजी याकरिता आजपर्यंत कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

“माझं कार्यालय-स्वच्छ कार्यालय” अभियानाचे तीन तेरा
माझं कार्यालय स्वच्छ कार्यालय अभियान हा उपक्रम शासनाच्या विविध विभागांमध्ये व शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छता,शिस्त आणि सुशोभीकरण यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबवला जातो. यामध्ये कार्यालयामध्ये स्वच्छता व नीटनेटकेपणा राखणे, आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे. स्वच्छतेबाबत जबाबदारीची भावना निर्माण करणे.नोंदी, फाइल्स व दस्तऐवज यांचे योग्य व्यवस्थापन करणे.
परंतु या कार्यालयामध्ये संपूर्ण वस्तुस्थिती- परिस्थिती या उलट दिसून आली आहे.
कार्यालयाच्या भिंतींवर शेवाळ, ओलसरपणा, काळवंडलेली, भिंतीस तडे, तसेच गळकी छप्पर यामुळे शासकीय कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. कार्यालय परिसर झाडाझुडपांनी वेढलेला असून, विषारी साप व विंचूंचा वावर नेहमीच सुरू असतो. स्वच्छतेचा पूर्ण अभाव असल्याने कर्मचारी व नागरिक दोघांनाही असुरक्षित वातावरणात रहावे लागत आहे.पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना शेजारील कासा पोलिस स्टेशनच्या आवारातील हातपंपावरून पाणी रोज आणावे लागते, ही नामुष्कीच कर्मचाऱ्यांवर ओढावली आहे.कार्यालय परिसरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी व इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून शिस्तभंग करून वाहनांची खुलेआम कार्यालयाच्या आवारात पार्किंग केली जाते.त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बालविकास प्रकल्प कार्यालय कासा येथील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून खुलासा प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
श्री. व्यंकटेश हुंडेकर.
एकात्मिक बालविकास प्रकल्प,जिल्हा कार्यक्रम अधिकारी