Uncategorized

डहाणू फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला चालना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

डहाणू फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला चालना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक


पालघर, दि. २० (प्रतिनिधी):
निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या डहाणू परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी असून, डहाणू फेस्टिव्हलच्या माध्यमातून पर्यटन विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
डहाणू येथे आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिव्हलचे उद्घाटन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी आमदार रविंद्र फाटक, राजेंद्र गावित, विनोद निकोले, विलास तरे, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणू नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, पालघर नगरपालिकेचे नगराध्यक्ष उत्तम घरत, तसेच विविध मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी डहाणूच्या सार्वजनिक वाहतूक सुविधांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. पूर्वी प्रस्तावित १० बसेसऐवजी आता २५ बसेस डहाणूसाठी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना अधिक सोयी उपलब्ध होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
तसेच, येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या बसचे अनावरण होणार असून, पुढील सहा महिन्यांत राज्यात सुमारे ३,००० नवीन बसेस दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यातील काही बसेस डहाणू भागासाठीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
पर्यटन विकासाच्या दृष्टीनेही सकारात्मक संकेत देताना त्यांनी सांगितले की, डहाणूसाठी पर्यटन विभागामार्फत सुमारे ४ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव विचाराधीन असून, पुढील काळात अधिक पर्यटन प्रकल्प राबवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
डहाणू फेस्टिव्हलच्या आयोजनाचे कौतुक करताना मंत्री सरनाईक म्हणाले, “ठाणे आणि मीरा-भाईंदर येथे आम्ही अनेक वर्षे फेस्टिव्हल आयोजित करत आलो आहोत, मात्र डहाणूचा हा उपक्रम अधिक प्रेरणादायी आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button