शिक्षणमहर्षी रजनीकांत भाई श्रॉफ यांचा ९० वा अभिष्टचिंतन सोहळा ….


शिक्षणमहर्षी रजनीकांत भाई श्रॉफ यांचा ९० वा अभिष्टचिंतन सोहळा ….
चिंचणी (प्रतिनिधी)चिंचणी तारापूर परिसरातील शिक्षण क्षेत्राला एक नवी दिशा देणारे दूरदृष्टीचे नेतृत्व व समाजभान जपणारे आदरणीय शिक्षण महर्षी रजनीकांत भाई पुरुषोत्तमदास श्राॅफ यांनी आपल्या जीवनाची ९० गौरवशाली वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवार दिनांक- २ जानेवारी २०२६ रोजी दु. ठीक ०३.०० वाजता के.डी. हायस्कूल मैदान चिंचणी, ता. डहाणू येथे संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून आयोजित केला आहे. रजनीकांतभाई श्राॅफ सरांचा जन्म- २ जानेवारी १९३६ साली झाला. ते के.डी. हायस्कूलचे माजी विद्यार्थी. १९६६ पासून आज पर्यंत संस्थेचे चेअरमन पद सांभाळत आहेत. त्यांचे शिक्षण हे यु. डी.सि.टी. मधून केमिकल इंजिनियर ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी कुठेही नोकरी व्यवसाय न करता आपल्या आयुष्याचा सर्वकाळ शैक्षणिक संस्थेची धुरा सांभाळण्यात घालवली आहे. पंचक्रोशीतील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये; तसेच त्याला रोजगाराभिमुख करणे, यासाठी शिक्षण संस्थेत विविध कौशल प्राप्त करूनच त्याने बाहेर पडावे असा दृष्टिकोन ठेवून शैक्षणिक संस्थेचे कार्य करीत आहेत. आज संस्थेच्या विविध सात शाखा असून त्यात के.जी. ते पी.जी. पर्यंतचे शिक्षण उपलब्ध होत आहे. गुणवत्तापूर्वक शिक्षण, शिस्त, संस्कार, सामाजिक बांधिलकी या मूल्यावर आधारित शिक्षण व्यवस्था उभारण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. यामध्ये १९७२ साली त्यांनी मुंबई बोरीवली येथे स्वतः भाड्याने खोली घेऊन चिंचणी परिसरातील सर्वधर्मीय, सामान्य कुटुंबातील व होतकरू विद्यार्थ्यांना मुंबईतील नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेता यावे म्हणून खाजगी हाॅस्टेल स्वखर्चाने सुरू करुन अनेक वर्ष सेवा दिली. तशाच प्रकारे चिंचणीच्या या आपल्या शैक्षणिक संकुलात अतिशय दुर्गम भागातील मुला- मुलींसाठी खाजगी हाॅस्टेल सुरु केले आहे. यामध्ये राहण्याची व भोजनाची विनामूल्य सोय गेल्या सहा वर्षापासून ते करीत आहेत. शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय सौरऊर्जा, कचरा व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, कौशल्य विकास, योग- प्राणायाम, निसर्ग प्रेम असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक स्वयंसेवी संस्थांनी राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात त्यांच्या सुविद्य पत्नी संस्थेच्या सदस्या डॉ. रमिलाबेन श्राॅफ यांचा मोठा हातभार लाभत आहे. या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सत्कार व गौरव करण्यात येणार असून; त्यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रफित व त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ‘ गौरव ग्रंथाचे ‘ प्रकाशन ही होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. रजनीकांत भाई श्राॅफ यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादायी असून पुढील पिढीसाठी ते दीपस्तंभ ठरत आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल.