Uncategorized

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रात 2025 मध्ये 26.86% निर्यात-आयात वाढ; व्यापारगतीला बळ

जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रात 2025 मध्ये 26.86% निर्यात-आयात वाढ; व्यापारगतीला बळ
मुंबई, 27 जानेवारी 2026
भारताचे पहिले बहुउत्पादन, बंदराधारित विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) विशेष आर्थिक क्षेत्राने पंचांग वर्ष 2025 मध्ये निर्यात-आयात कंटेनर हाताळणीत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. या वाढीमुळे देशातील वाढती व्यापारगतिविधी तसेच निर्यात-आयात क्षेत्रातील भागधारकांचा जेएनपीए विआक्षेवरील वाढता विश्वास स्पष्टपणे दिसून येतो.
पंचांग वर्ष 2025 दरम्यान जेएनपीए विआक्षेने एकूण 20,693 टीईयू इतका निर्यात-आयात कंटेनर व्यवहार हाताळला आहे. याच्या तुलनेत पंचांग वर्ष 2024 मध्ये हा आकडा 16,312 टीईयू इतका होता. त्यामुळे वर्ष-दर-वर्ष सुमारे 26.86 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ औद्योगिक कार्यक्षमता, सुधारित लॉजिस्टिक्स व्यवस्था आणि विआक्षेमधून होणाऱ्या मालवाहतुकीत झालेली वाढ अधोरेखित करते.
नेतृत्वाची प्रतिक्रिया
या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना श्री. गौरव दयाल (भा.प्र.से.), अध्यक्ष, जेएनपीए, म्हणाले,
“पंचांग वर्ष 2025 मध्ये जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्रात झालेली निर्यात-आयात व्यवहारातील भक्कम वाढ ही येथील पायाभूत सुविधा, सुलभीकरण क्षमता आणि विश्वासार्हतेवर उद्योग व व्यापार क्षेत्राने दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. जेएनपीए विआक्षे पारंपरिक टर्मिनल-केंद्रित भूमिकेपलीकडे जाऊन एकात्मिक बंदर परिसंस्था म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. या सर्वसमावेशक दृष्टीकोनामुळे उद्योगांसाठी मूल्यनिर्मिती, पुरवठा साखळीतील प्रवाहीपणा आणि हितधारकांसाठी दीर्घकालीन लाभ सुनिश्चित होतील.”
औद्योगिक विस्ताराला चालना
जेएनपीए विशेष आर्थिक क्षेत्र 277.38 हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. यापैकी 129.73 हेक्टर क्षेत्र आधीच भाडेपट्ट्यावर देण्यात आले असून, भविष्यातील भाडेपट्ट्यासाठी 34.16 हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. सध्या येथे 11 कार्यरत युनिट्स तसेच फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोन (FTWZ) कार्यरत असून, यामुळे औद्योगिक हालचाल सातत्याने वाढत आहे आणि भविष्यातील विकासासाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत.
निर्यात-आयात व्यवहारातील सातत्यपूर्ण वाढेमुळे जेएनपीए विआक्षेचे महत्त्वपूर्ण व्यापार व लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून असलेले स्थान अधिक दृढ झाले आहे. रणनीतिक स्थान, बंदराशी अखंड जोडणी आणि उद्योगस्नेही धोरणांमुळे जेएनपीए विआक्षे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी विश्वासार्ह केंद्र म्हणून पुढे येत आहे.
जनेप प्राधिकरणाबद्दल
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जनेप प्राधिकरण) हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. 26 मे 1989 रोजी स्थापन झालेल्या या बंदराने बल्क कार्गो टर्मिनलपासून देशातील अग्रगण्य कंटेनर बंदर म्हणून झपाट्याने प्रगती केली आहे.
सध्या जनेप प्राधिकरण एनएसएफटी, एनएसआयसीटी, एनएसआयजीटी, बीएमसीटी आणि एपीएमटी अशी पाच कंटेनर टर्मिनल्स चालवत आहे. याशिवाय सामान्य मालवाहतुकीसाठी उथळ पाण्याचा बर्थ, बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टियमद्वारे व्यवस्थापित लिक्विड कार्गो टर्मिनल तसेच इतर भारतीय बंदरांना जोडणारा नव्याने बांधलेला किनारी धक्का येथे कार्यरत आहे.
277 हेक्टर क्षेत्रात विकसित करण्यात आलेले जेएनपीएचे बहुउत्पादक विशेष आर्थिक क्षेत्र निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे. याशिवाय, जेएनपीए वाढवण येथे सर्व-हवामान, डीप ड्राफ्ट ग्रीनफिल्ड बंदर विकसित करत असून, ते महाराष्ट्रातील भारताचे 13वे मोठे बंदर ठरणार आहे. हे बंदर स्थापनेपासून 100 टक्के हरित बंदर असणार असून, जागतिक दर्जाच्या अव्वल 10 बंदरांमध्ये स्थान मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button