सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाअंतर्गत पालघर जिल्ह्यात राज्यस्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांची पाहणी


सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाअंतर्गत पालघर जिल्ह्यात राज्यस्तरीय आरोग्य अधिकाऱ्यांची पाहणी
पालघर (प्रतिनिधी):
सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याचा आढावा घेण्यासाठी पालघर जिल्ह्यात राज्यस्तरीय आरोग्य विभागाकडून पाहणी करण्यात आली. याअंतर्गत राज्य आरोग्य विभागाचे संचालक मा. डॉ. आंबाडेकर तसेच उपसंचालक मा. डॉ. नांदापुरकर (मुंबई मंडळ – ठाणे) यांनी मोखाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा अंतर्गत असलेल्या वाकड पाडा उपकेंद्रास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
या भेटीदरम्यान ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या तपासणी, नोंदणी, उपचार तसेच जनजागृती उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांपर्यंत सिकलसेल आजाराविषयी योग्य माहिती पोहोचवणे, वेळेवर तपासणी व उपचार सुनिश्चित करणे यावर विशेष भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. अभियान अधिक प्रभावी व यशस्वीपणे राबविण्यासाठी उपस्थित अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब चत्तर, मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पुष्पा गोवारी, वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित आरोग्य कर्मचारी उपस्थित होते