Uncategorized

तलासरी येथे बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेतप्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार

तलासरी येथे बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेत
प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार
तलासरी | प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनाची दारे खुली व्हावीत, या उद्देशाने तलासरी येथील आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (मुंबई विद्यापीठ संलग्न) येथे शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
‘मानविकी, विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व उदयोन्मुख प्रवाह’ या विषयावर आयोजित या परिषदेत देश-विदेशातील सुमारे २०० संशोधकांनी प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने आपले शोधनिबंध सादर केले. परिषदेसाठी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, संशोधक, प्राचार्य, प्रशासकीय अधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदेच्या प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत आकर्षक तारपा नृत्याने करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी महाविद्यालयातील आदिवासी संस्कृती संग्रहालयास भेट देत वारली समाजाची आदिम संस्कृती जाणून घेतली.
परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. डॉ. ए. डी. सावंत (माजी कुलगुरू, राजस्थान विद्यापीठ व माजी प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) यांनी तरुणांना संशोधनाकडे वळण्याचे आवाहन केले. विशेष अतिथी प्रा. डॉ. के. एन. घोरुडे यांनी संशोधन प्रक्रिया व प्रकाशनातील बदलांवर मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय वक्ते प्रा. डॉ. कुले जेराल्ड (युगांडा) व प्रा. डॉ. गोडविन केटो (घाना) यांनी जागतिक संशोधन प्रवाहांवर आपले विचार मांडले.
या परिषदेनिमित्त लोकशक्ती बाबा भारती प्रतिष्ठान, पुणे यांच्यावतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण व अतिदुर्गम भागातील शिक्षणविकासासाठी त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
परिषदेत मानविकी, समाजशास्त्र, मराठी साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान (AI, नॅनो टेक्नॉलॉजी), वाणिज्य, व्यवस्थापन, ग्रंथालय शास्त्र, भारतीय ज्ञान प्रणाली (IKS) व शाश्वत विकास अशा विविध विषयांवर चर्चा सत्रे घेण्यात आली. दुपारच्या टेक्निकल सत्रांचे अध्यक्षपद विविध महाविद्यालयांच्या प्राचार्य व प्राध्यापकांनी भूषवले.
निरोपसत्राच्या अध्यक्षस्थानी कॉम. रुपेश राणे, सचिव, आदिवासी प्रगती मंडळ होते. त्यांनी अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती वाढून समाज समृद्ध होतो, असे मत व्यक्त केले.
परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी परिषदेचे समन्वयक प्रा. निलेश साळवे, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button