१० वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शोधपालघर पोलिसांना मोठे यश
१० वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शोध
पालघर पोलिसांना मोठे यश
पालघर | प्रतिनिधी
सन २०१६ साली वाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मानव मिसिंग रजिस्टर क्रमांक २०/२०१६ मधील तब्बल १० वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे.
बेपत्ता व्यक्तीचे नाव प्रवीण गोपीनाथ पवार (वय ३९), रा. पवारवस्ती, शेवगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर असे आहे. सन २०१६ मध्ये ते विक्रमगड येथे रुग्णालयात कामानिमित्त आले होते. त्यावेळी वाडा येथे असताना त्यांचा व कुटुंबीयांचा वाद झाल्याने रागाच्या भरात त्यांनी कोणालाही न सांगता घर सोडले. त्यानंतर त्यांनी कुटुंबीयांशी कोणताही संपर्क साधला नव्हता.
कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून वाडा पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, दीर्घकाळ त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता.
पालघर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या “ऑपरेशन मुस्कान–१४” अंतर्गत हरवलेली मुले, महिला व बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत वाडा पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या जुन्या बेपत्ता प्रकरणांचा नव्याने तपास करण्यात येत आहे.
त्याच अनुषंगाने वाडा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक / वनवे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत असताना सदर बेपत्ता व्यक्ती दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. खात्री करून पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांशी संपर्क साधून दिला.
तब्बल १० वर्षांनंतर कुटुंबीयांची भेट घडवून आणण्यात पालघर पोलिसांना यश आले असून, या कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नराळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.