‘गोदावरी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी जिजाऊंचे संस्कार घेऊन स्वामी विवेकानंदांसारखा तेजस्वी व्हावा’ — स्वामी तनिष्ठानंद यांचे राष्ट्रीय युवा दिनी प्रतिपादन



‘गोदावरी महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी जिजाऊंचे संस्कार घेऊन स्वामी विवेकानंदांसारखा तेजस्वी व्हावा’ — स्वामी तनिष्ठानंद यांचे राष्ट्रीय युवा दिनी प्रतिपादन
तलासरी | प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद जयंती, माँसाहेब जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून तलासरी येथील आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS) महाविद्यालय एकक व महाविद्यालय करिअर कट्टा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामकृष्ण मिशन, पालघरचे स्वामी तनिष्ठानंद तसेच श्री साई एड्युकेअर प्रा. लि.चे संस्थापक संचालक डॉ. निपुण शाह उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद व माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांना उजाळा दिला.
प्रमुख वक्ते स्वामी तनिष्ठानंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वामी विवेकानंदांचे चरित्र व त्यांच्या वाङ्मयाचे महत्त्व विशद केले. युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या स्वदेशी मंत्राचे अनुकरण करून राष्ट्रउभारणीत योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन करत आजच्या काळातही त्यांचे विचार कसे उपयुक्त आहेत यावर सखोल चर्चा केली.
त्यानंतर डॉ. निपुण शाह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्वामी विवेकानंदांचा “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका” हा मूलमंत्र सांगितला. आत्मभान जागवत प्रत्येकाने देशसेवेत आपला वाटा उचलून स्वतःसह समाजाची प्रगती साधावी, असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी अध्यक्षीय भाषणात राष्ट्र बलवान होण्यासाठी युवकांचे आरोग्य व सुदृढ शरीरयष्टी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद व माँसाहेब जिजाऊ यांच्या विचारांचा अभ्यास करून ‘आदर्श युवक’ बनण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. अनिल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शेफाली गहला, डॉ. कमलेश माळी, डॉ. सचिन राऊत आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक, १९३ एनएसएस स्वयंसेवक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.