राज्य क्रीडा दिन उत्साहात साजराखेळाडू संकटात कधीच डगमगत नाही– प्राचार्य डॉ. किरण सावे



राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा
खेळाडू संकटात कधीच डगमगत नाही
– प्राचार्य डॉ. किरण सावे
पालघर (प्रतिनिधी) | १५ जानेवारी
खेळाडू हा कोणतेही संकट आले तरी खचून न जाता धैर्याने त्याला सामोरा जातो. अभ्यासात कमी गुण मिळाल्यास विद्यार्थी निराश होतो, मात्र खेळाडूची मानसिक जडणघडण वेगळी असते. त्यामुळेच कला, क्रीडा, नोकरी व व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत खेळाडू यशस्वी ठरतात, असे प्रतिपादन दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले.
ऑलिम्पिक वीर कै. खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त १५ जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यात राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. किरण सावे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी खाशाबा जाधव यांचे नाव क्रीडा क्षेत्रातील ऊर्जेचे प्रतीक असल्याचे सांगत, त्या ऊर्जेचे रूपांतर पदकांमध्ये करावे तसेच ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी खेळाडूंनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.
खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, दांडेकर महाविद्यालय व जिल्हा क्रीडा संकुल येथे सॉफ्टबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आदी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडूंसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा मार्गदर्शक व पंच यांचा सत्कारही करण्यात आला.
तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी १५ जानेवारी हा दिवस खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.
या कार्यक्रमास दांडेकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख, क्रीडा संचालक संतोष चुरी, सत्तू कदम महाविद्यालयाचे प्रीतम घरत, दिगंबर कदम, शुभांगी पाटील, प्रितेश पाटील, राकेश ठाकरे, उज्वला लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.