Uncategorized

काॅ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.“प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात शिवाजी व्हावे” – डॉ.भगवान अ. राजपूत.

काॅ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.“प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात शिवाजी व्हावे” – डॉ.भगवान अ. राजपूत.

दि. १९ तलासरी (प्रतिनिधी)

आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, कॉ. गोदावरी शामराव परुळेकर व कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य सहा.प्राध्यापक निलेश साळवे यांनी प्रास्ताविक सादर करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, स्वतःचे स्वराज्य निर्माण करणे ही अत्यंत धाडसी व कठीण गोष्ट आहे. आज एखादा छोटासा व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते; मात्र शिवाजी महाराजांनी अल्पवयातच स्वराज्य स्थापनेचे धाडस दाखवले. त्यांच्या स्वराज्यात न्याय, स्वाभिमान आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन होता. सर्व धर्मांचा सन्मान, स्त्रियांचा आदर, शिस्तबद्ध सेना आणि प्रजेसाठी कल्याणकारी धोरणे ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली .
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी “जय भवानी, जय शिवाजी” या घोषणेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनातील नियोजन, व्यवस्थापन, दूरदृष्टी, अष्टप्रधान मंडळ, प्रशासन व्यवस्था, युद्धनीती, स्थापत्यशास्त्र आणि कृषीविषयक दृष्टिकोन यांची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली, तसेच महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच स्त्री सन्मान, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास यांसारख्या मूल्यांचा अंगीकार केला होता हे देखील विद्यार्थ्यांना पटवून दिले.
“खरा शिवभक्त तोच, जो शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणतो,” हे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. राजपूत यांनी सांगितले की, महापुरुषांच्या कार्याची आठवण राहावी यासाठी जयंती साजरी केली जाते. तसेच शिवाजी महाराजांच्या स्वाभिमान , आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, नैतिकता इत्यादी मूल्यांना अधोरेखित केले व त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, आपणही आपल्या क्षेत्रात ‘शिवाजी’ बनून यश मिळवावे. तसेच शिवाजी महाराज, जिजाऊ आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांचे चरित्र वाचून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी व जीवनात सकारात्मक बदल घडवून आणावेत.

यानंतर प्रथम वर्ष कला विभागाची विद्यार्थिनी कु.सरस्वती धोडी हिने शिवाजी महाराजांवर आधारित छंद सादर केला.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. अर्जुन होन, डॉ. वैभव माने व इतर सर्व सहायक प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे १४५ हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुजाता गावित यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहा. प्रा. अमोल दाबडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button