Uncategorized

जिल्हा परिषद पालघर येथे उत्साहात शिवजयंती साजरी; ‘उल्हास’ ॲप व जिल्हा वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन

जिल्हा परिषद पालघर येथे उत्साहात शिवजयंती साजरी; ‘उल्हास’ ॲप व जिल्हा वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन


पालघर (प्रतिनिधी)| दिनांक १९ फेब्रुवारी २०२६
जिल्हा परिषद पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) व्यंकटराव हुंडेकर आणि जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी, स्वराज्य स्थापनेतील योगदान आणि न्यायनिष्ठ प्रशासनाचा आदर्श अधोरेखित केला. महाराजांनी रयतेच्या कल्याणाला प्राधान्य देणारी लोकाभिमुख व सर्वसमावेशक शासनव्यवस्था उभारली. त्यांच्या विचारांचे आचरण करणे हीच खरी त्यांना अभिवादन ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील, शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या आदर्शांचे स्मरण केले.
याच प्रसंगी शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेल्या ‘उल्हास ॲप’च्या माहितीपर पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच पालघर जिल्हा वार्षिक विशेषांक २०२५–२६ चे प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकात “उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम”सह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक उपक्रमांचा संक्षिप्त आढावा सादर करण्यात आला आहे.
उत्साही व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाभिमुख कार्याची भावना अधिक दृढ झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button