छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पालघरमध्ये “स्वच्छता पंधरवडा”चा शुभारंभ



छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पालघरमध्ये “स्वच्छता पंधरवडा”चा शुभारंभ
पालघर (प्रतिनिधी)
“प्लास्टिकमुक्त, दुर्गंधीमुक्त व स्वच्छ-सुंदर पालघर” घडविण्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनचळवळीचा संकल्प
दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पावन निमित्ताने पालघर जिल्ह्यात “स्वच्छता पंधरवडा” अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, तहसीलदार रमेश शेडगे तसेच जिल्हा परिषद स्वच्छ मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारसकर आणि विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. स्वच्छतेची सामूहिक शपथ घेऊन तहसील कार्यालय परिसरात प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अधिकाऱ्यांनी नागरिकांनी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून जिल्हा स्वच्छतेत आदर्श ठरवावा, असे आवाहन केले.
“प्लास्टिकमुक्त, दुर्गंधीमुक्त व स्वच्छ-सुंदर पालघर जिल्हा” या उद्दिष्टाने १९ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२६ दरम्यान संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. जाखड व मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व तालुका प्रशासनाला प्रभावी अंमलबजावणीबाबत आवश्यक सूचना दिल्या.
ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्र, राष्ट्रीय महामार्ग, एमआयडीसी परिसर, आठवडी बाजार, नदी-नाले, तलाव व समुद्रकिनारे येथे साचलेला प्लास्टिक व इतर कचरा हटविण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याचे ढिगारे (लेगसी वेस्ट साईट्स) व ‘ब्लॅक स्पॉट’ ठिकाणांची स्वच्छता करून त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे.
जिल्ह्यात प्लास्टिकच्या निर्मिती, विक्री, वितरण व वापरावर कठोर बंदी लागू करण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मोहिमेचे मूल्यमापन करण्यासाठी विशेष प्रश्नावली तयार करण्यात आली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था व यंत्रणांचा गौरव केला जाणार आहे.
अभियानाची व्यापक जनजागृती व्हावी यासाठी सोशल मीडियावर #cleanpalghar, #greenpalghar आणि #plasticfreepalghar हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
“स्वच्छता हीच खरी सेवा” या भावनेतून प्रत्येक नागरिकाने कचरा व्यवस्थापनात आपला खारीचा वाटा उचलत स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पालघर घडवूया, असा सामूहिक निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.