तलासरीत ‘उद्योजकता जागरूकता’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादतरुणांना स्वावलंबनाकडे वाटचालीचे मार्गदर्शन; १८६ विद्यार्थ्यांचा सहभाग


तलासरीत ‘उद्योजकता जागरूकता’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
तरुणांना स्वावलंबनाकडे वाटचालीचे मार्गदर्शन; १८६ विद्यार्थ्यांचा सहभाग
तलासरी :(प्रतिनिधी) तरुणांमध्ये कौशल्य विकास आणि व्यावसायिक वृत्ती जोपासण्याच्या उद्देशाने तलासरी येथील कॉ. गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामार्फत ‘उद्योजकता जागरूकता’ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम गजानन नाईक बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्र आणि खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC), डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० ते १.३० या वेळेत पार पडला.
कार्यशाळेचा मुख्य भर तरुणांमधील कौशल्य विकास (स्किल डेव्हलपमेंट) आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावर होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे छोटे-मोठे उद्योग सुरू करून स्वावलंबी व्हावे, हा कार्यक्रमाचा प्रमुख हेतू होता.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खादी व ग्रामोद्योग केंद्र, डहाणूचे संचालक श्री. सुनील कांबळे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध सरकारी योजना तसेच उद्योगासाठी उपलब्ध अनुदानाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षण प्रभारी श्री. अखिल कौशिक यांनी उद्योग सुरू करताना आवश्यक तांत्रिक कौशल्ये आणि प्रशिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी भूषवले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी नवी कौशल्ये आत्मसात करून उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. उपप्राचार्य निलेश साळवे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाणिज्य विभागाचे प्रा. महेश माळवदकर आणि प्रा. रितेश रायचणा यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील एकूण १८६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.