Uncategorized

ग्लोबल कोकण महोत्सवात सायबर जनजागृती मोहिमेचे आयोजन

ग्लोबल कोकण महोत्सवात सायबर जनजागृती मोहिमेचे आयोजन


पालघर :(प्रतिनिधी) दिनांक १८ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मौजे शिरगाव, ता. जि. पालघर येथे कोकण भूमी प्रतिष्ठानतर्फे “ग्लोबल कोकण महोत्सव” व “पालघर मिनी सरस प्रदर्शन” आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात पालघर जिल्हा पोलिस दलामार्फत सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सायबर पोलिस ठाण्याचा विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे.
या स्टॉलच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना विविध सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यात ऑनलाइन फसवणूक, OTP/लिंक स्कॅम, सोशल मीडियावरील फसवणूक टाळण्याचे उपाय, बँकिंग व UPI व्यवहार सुरक्षित ठेवण्याचे मार्ग, तसेच सायबर गुन्हा घडल्यास त्वरित १९३० हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे महत्त्व याबाबत माहिती दिली जात आहे. तसेच www.cybercrime.gov.in� या संकेतस्थळावर ऑनलाइन तक्रार कशी नोंदवावी याचेही मार्गदर्शन केले जात आहे. महिला व बालकांविरुद्ध होणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत विशेष माहितीही नागरिकांना दिली जात आहे.
स्टॉलवर नागरिकांच्या शंकांचे निरसन प्रत्यक्ष मार्गदर्शन, माहितीपत्रके वाटप व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्टॉलला भेट देऊन सायबर सुरक्षिततेबाबत माहिती घ्यावी व स्वतःसह आपल्या कुटुंबीयांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जागरूक राहावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक श्री. यतीश देशमुख यांनी केले आहे.
ही जनजागृती मोहीम पोलिस अधीक्षक श्री. यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक श्री. विनायक नरळे व पोलिस निरीक्षक श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाद्वारे राबविण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button