Uncategorized

पालघरमध्ये भीषण अपघात : मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू

पालघरमध्ये भीषण अपघात : मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू


पालघर,(प्रतिनिधी )दि. १३ मार्च : पालघर शहरात घडलेल्या एका भीषण अपघातात मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात पालघर पूर्व येथील जुना पालघर परिसरातील जैन मंदिर – गांधीनगरजवळील रेल्वे रुळांवर घडला.
मृत तरुणांची ओळख स्वप्निल शैलेश पालांडे (वय २३), कुणाल कुमार दुबळा (वय २३) आणि अफरोज खलील शेख (वय २८) अशी झाली आहे. तिघेही पालघर पूर्व येथील वीरेंद्र नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही रेल्वे ट्रॅकजवळ गेले असताना भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीची धडक बसली. या भीषण अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे ट्रॅक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, या भागात रेल्वे रुळांजवळ नशा आणि असामाजिक कृत्यांच्या तक्रारी यापूर्वीही वारंवार समोर आल्या होत्या. मात्र त्यावर वेळीच कठोर कारवाई करण्यात आली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, रेल्वे ट्रॅक परिसरात कडक नजर ठेवणे, नियमित गस्त घालणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या असत्या, तर अशी दुर्दैवी घटना टाळता आली असती. त्यामुळे आता रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी अशा संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
ही घटना पालघर शहरासाठी गंभीर इशारा ठरत असून रेल्वे ट्रॅकजवळील थोडीशीही निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button