Uncategorized

झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; सुपर ८ मध्ये दिमाखदार प्रवेश

झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर ऐतिहासिक विजय; सुपर ८ मध्ये दिमाखदार प्रवेश

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील थरारक लढतीत झिम्बाब्वेने यजमान श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करत क्रिकेटविश्वाला सुखद धक्का दिला. आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने १७९ धावांचे आव्हान अवघ्या १९.३ षटकांत पूर्ण करून सुपर ८ फेरीत अपराजित प्रवेश केला.
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ७ बाद १७८ धावा केल्या. पथुम निसांका याने ४१ चेंडूत ६२ धावांची संयमी खेळी करत डावाला आकार दिला. पवन रथनायके याने २५ चेंडूत ४४ धावांचे आक्रमक योगदान दिले. मात्र मधल्या फळीत नियमित अंतराने गडी बाद होत गेल्याने श्रीलंकेला अपेक्षित मोठी धावसंख्या उभारता आली नाही. झिम्बाब्वेकडून ग्रेम क्रेमर आणि ब्रॅड इव्हान्स यांनी प्रत्येकी २ बळी घेत प्रभावी मारा केला.
लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने सुरुवातीपासूनच सकारात्मक पवित्रा घेतला. ब्रायन बेनेट आणि ताडिवानाशे मारुमानी या जोडीने अवघ्या ८.३ षटकांत ६९ धावांची भागीदारी करत मजबूत पाया रचला. मारुमानी बाद झाल्यानंतर रायन बर्लने १२ चेंडूत २३ धावांची झटपट खेळी केली. त्यानंतर कर्णधार सिकंदर रझा मैदानात उतरला आणि अवघ्या २६ चेंडूत ४५ धावा करत डावाला वेग दिला. शेवटी ब्रायन बेनेटने संयमी खेळ करत ४८ चेंडूत नाबाद ६३ धावा करत संघाला विजयाच्या उंबरठ्यापार नेले.
या विजयासह झिम्बाब्वेने अनेक विक्रम आपल्या नावे केले. टी–२० विश्वचषकाच्या इतिहासात श्रीलंकेविरुद्धचा हा झिम्बाब्वेचा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग ठरला. पुरुष टी–२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा झिम्बाब्वेचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग आहे. विशेष म्हणजे संपूर्ण गट फेरीत एकही सामना न हरता सुपर ८ मध्ये प्रवेश करणाऱ्या मोजक्या संघांमध्ये झिम्बाब्वेने आपले नाव कोरले. ब्रायन बेनेट संपूर्ण स्पर्धेत अद्याप बाद न होणारा फलंदाज ठरला असून त्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावले.
सामन्यानंतर बोलताना सिकंदर रझा म्हणाला, “कोणालाही आमच्याकडून अशी कामगिरी अपेक्षित नव्हती. मात्र संघाने स्वतःवर विश्वास ठेवला आणि मेहनतीचे चीज केले. सुपर ८ मध्येही आम्ही हीच लय कायम राखू.” श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाका याने पराभव स्वीकारत संघाने पुढील फेरीत अधिक आत्मविश्वासाने खेळण्याची गरज व्यक्त केली.
हा विजय केवळ एका सामन्याचा नसून, झिम्बाब्वे क्रिकेटच्या नव्या युगाची नांदी ठरू शकतो. ‘अंडरडॉग’ म्हणून मैदानात उतरलेला हा संघ आता प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत असून, सुपर ८ फेरीतील त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button