जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण ची जागतिक आव्हानांतही उत्कृष्ट कामगिरी कायम

जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण ची जागतिक आव्हानांतही उत्कृष्ट कामगिरी कायम

मुंबई,(प्रतिनिधी )दि. 14 एप्रिल 2026 : जागतिक पातळीवरील बदलत्या परिस्थिती आणि मध्यपूर्वेतील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) ने कार्यक्षम स्थिरता राखत सर्व प्रमुख कामगिरी निर्देशांकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जागतिक पुरवठा साखळीतील अनिश्चिततेच्या काळातही बंदरातील कामकाज सुरळीत ठेवण्यात जेएनपीएला यश आले आहे.
पूर्वतयारी, संसाधनांचा प्रभावी वापर आणि भागधारकांशी समन्वय यामुळे आयात कंटेनर थांबण्याचा कालावधी फेब्रुवारी 2026 मधील 25.17 तासांवरून मार्च 2026 मध्ये 22.68 तासांपर्यंत कमी झाला आहे. डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी (डीपीडी) आणि डायरेक्ट पोर्ट एन्ट्री (डीपीई) या उपक्रमांनी 2025-26 या आर्थिक वर्षात अनुक्रमे 74.57% आणि 45.74% कामगिरी नोंदवत मालवाहतुकीत वेग आणि कार्यक्षमता वाढवली आहे.
सरासरी टर्नअराउंड वेळ 22.61 तासांवर स्थिर असून, जहाज हाताळणीतील उत्कृष्टता अधोरेखित झाली आहे. ट्रान्सशिपमेंट कंटेनर हाताळणीतही 5% वरून 16% पर्यंत वाढ झाली आहे. बंदरात सध्या साठवण क्षमतेपैकी सुमारे 50% जागा वापरात असून, निर्यात कंटेनरसाठी अतिरिक्त 9.2 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्य संचालन सुरळीत ठेवण्यासाठी जेएनपीएने समर्पित कार्यदल स्थापन केले असून, टर्मिनल ऑपरेटर व हितधारकांशी सतत समन्वय साधला जात आहे. ‘बॅक टू टाऊन’ (बीटीटी) वाहतूक, तात्पुरती पुनर्वाहतूक आदी उपाययोजनांमुळे गर्दी नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले आहे.
1989 मध्ये स्थापन झालेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण ने आज देशातील प्रमुख कंटेनर बंदर म्हणून स्थान मिळवले आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, बहुउत्पादक विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) आणि वाढवण येथे उभारण्यात येत असलेल्या ग्रीनफिल्ड बंदर प्रकल्पामुळे भारताच्या निर्यात क्षमतेला मोठी चालना मिळणार आहे.