BLO च्या मानधनात वाढ करा आणि थकीत रक्कम त्वरित द्या; जुनी पेन्शन संघटनेचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

BLO च्या मानधनात वाढ करा आणि थकीत रक्कम त्वरित द्या; जुनी पेन्शन संघटनेचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पालघर/प्रसाद भालेराव
भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक प्रक्रियेचा कणा असलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (BLO) प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा शाखा पालघरच्या वतीने सोमवारी (१३ एप्रिल) जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे आणि उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा) गोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संघटनेने चर्चा केली. यावेळी प्रशासनाकडून या मागण्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या मागण्या आणि समस्या:
BLO म्हणून काम करणारे शिक्षक आणि महसूल कर्मचारी आपल्या मूळ पदाची कर्तव्ये सांभाळून सुट्टीच्या दिवशी व कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त निवडणूक विभागाचे काम करतात. मात्र, सध्या त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले.
निवेदनातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
•थकीत मानधन: अनेक महिन्यांपासून वार्षिक मानधन आणि विशेष मोहिमांचे (SIR) इन्सेंटिव्ह प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
•अपुरे मानधन: वाढती महागाई आणि कामाचा व्याप पाहता २०२५ च्या नवीन निर्देशांनुसार मानधनात वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
•सुविधांचा अभाव: ‘BLO App’ वर काम करताना स्वतःचा मोबाईल आणि इंटरनेट वापरावा लागतो. यासाठी शासकीय टॅब, इंटरनेट डेटा खर्च आणि प्रवास भत्ता देण्याची मागणी लावून धरली आहे.
•कामाचा ताण: शिक्षकांना अशैक्षणिक कामातून सवलत मिळावी किंवा BLO कामासाठी निश्चित वेळ ठरवून देण्यात यावी.
•प्रशासनाचे आश्वासन:
संघाटनेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. “BLO बांधवांच्या समस्या रास्त असून, थकीत मानधन आणि इतर सुविधांबाबत संबंधित विभागाला सूचना देऊन लवकरच कार्यवाही केली जाईल,” असे आश्वासन भागडे यांनी दिले.
यावेळी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी अध्यक्ष लक्ष्मण ननवरे, सचिव प्रदीप गायकवाड, उपाध्यक्ष शाहू भारती, सचिन बामनकर, सचिन शेळके, ज्ञानेश्वर सरक, विकास जाधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.