समाजसेवक सावे काकांचा अमृत महोत्सव; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा


समाजसेवक सावे काकांचा अमृत महोत्सव; गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा
तलासरी, दि. १५(डॉ.दत्तात्रय शिंदे )
क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे दापचरीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, समाजसेवक श्री. सावे काका यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून तलासरी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सावे काका यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
तलासरी येथील पुरातन श्री गणेश मंदिरात हा सोहळा संपन्न झाला. सावे काका यांची ओळख तलासरी परिसरात एक उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू आणि कबड्डीपटू म्हणून आहे. त्याचबरोबर मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठी नेहमी मदत करणारे आणि गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे सहाय्यक म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच सेवाभावी वृत्तीचे दर्शन त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा घडले.
या प्रसंगी शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये गोदावरी सिनियर कॉलेजचे श्री. पाटील सर, गृहस्वप्न आर्किटेक्ट फर्मचे श्री. प्रणय घरत सर आणि नुकतेच निवृत्त झालेले पोलीस अधिकारी श्री. सोळंके सर, किशोर जी गोऱ्हेकर यांचा समावेश होता. मान्यवरांनी आपल्या मनोगतात सावे काकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा गौरव करत, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाला मोठी मदत होत असल्याचे नमूद केले.
नव्या शैक्षणिक वर्षाचे साहित्य मिळाल्याने उपस्थित मुला-मुलींच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला. सर्व विद्यार्थ्यांनी सावे काकांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात करण्यात आली.