सर्व अनधिकृत बांधकामे होत असताना प्रशासन कुठे होते?कोणाच्या आशीर्वादाने उभ्या राहिल्या झोपडपट्ट्या?बेलापूर विभागात अनधिकृत झोपड्यांवर अखेर धडक कारवाई

सर्व अनधिकृत बांधकामे होत असताना प्रशासन कुठे होते?
कोणाच्या आशीर्वादाने उभ्या राहिल्या झोपडपट्ट्या?
बेलापूर विभागात अनधिकृत झोपड्यांवर अखेर धडक कारवाई
दि. 24 जानेवारी 2026
मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)
नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर विभागात अनधिकृत झोपडपट्ट्यांवर अखेर तोडक कारवाई करण्यात आली असली, तरी “ही बांधकामे होत असताना प्रशासन नेमके कुठे होते?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. सार्वजनिक उद्यानासाठी राखीव भूखंडावर तब्बल २९ कच्च्या खोल्या उभ्या राहतात, यामागे कोणाचा आशीर्वाद होता, असा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, तसेच अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर विभागात ही धडक कारवाई केली.
करावे गाव, सेक्टर–३८ येथील प्लॉट क्रमांक १५८ समोरील महापालिकेच्या उद्यानासाठी राखीव भूखंडावर अतिक्रमण करून अनधिकृत झोपडपट्टी उभारण्यात आली होती. याबाबत संबंधितांना स्वयंहून बांधकाम हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त व विभाग अधिकारी प्रशांत नेरकर, सहाय्यक अभियंता आत्माराम काळे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारवाईसाठी १० मजूर, १ जेसीबी तसेच आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीचा वापर करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
महत्त्वाचे म्हणजे, निष्कासनानंतर कारवाईचे श्रेय घेतले जात असले तरी अशा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण उभे राहेपर्यंत दुर्लक्ष का झाले? याची चौकशी होणार का, असा सवाल नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. केवळ तोडक कारवाई न करता भविष्यात अशी अतिक्रमणे होऊच नयेत, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या वतीने यापुढेही अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.