Uncategorized

विरार स्थानकावर प्रवाशांच्या जिवाशी खेळ!प्लॅटफॉर्म क्रमांक ४-अ वर डहाणू लोकलसाठी तुडुंब गर्दी — अपघात कधीही संभव!

विरार स्थानकावर प्रवाशांच्या जिवाशी खेळ!
प्लॅटफॉर्म क्रमांक ४-अ वर डहाणू लोकलसाठी तुडुंब गर्दी — अपघात कधीही संभव!
विरार–डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाअंतर्गत नवीन तिसरी व चौथी रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू असून, दि. ४ डिसेंबर २०२५ पासून सुमारे तीन महिन्यांसाठी विरार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३-अ ची लांबी वाढवणे व नवीन होम प्लॅटफॉर्म क्रमांक ५-अ चे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या कामाचा थेट फटका प्लॅटफॉर्म क्रमांक ४-अ वरील प्रवाशांना बसत असून, परिस्थिती आता अत्यंत धोकादायक बनली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या नावाखाली प्लॅटफॉर्म ४-अ वर पत्रे (बॅरिकेड्स) लावण्यात आल्याने प्लॅटफॉर्मची रुंदी अतिशय निमुळती झाली आहे. परिणामी, डहाणू लोकल आल्यानंतर उतरणारे व चढणारे प्रवासी अक्षरशः एकमेकांवर आदळत असून, रोजच चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. ही परिस्थिती पाहता मोठा अपघात कधीही घडू शकतो, अशी तीव्र भीती प्रवाशांमध्ये आहे.
या गर्दीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी विद्यार्थी यांना बसत असून, त्यांचा रोजचा प्रवास त्रासदायक व असुरक्षित झाला आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत विरारहून वसई, भाईंदर ते थेट अंधेरीपर्यंत प्रवास करणाऱ्या कामगार वर्गाला या गर्दीमुळे लोकलमध्ये चढताच येत नाही. परिणामी, इच्छित वेळेची लोकल सुटून जाते आणि कामावर लेटमार्क लागण्याची नामुष्की त्यांना सहन करावी लागत आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेता, प्लॅटफॉर्म क्रमांक ३-अ चे काम पूर्ण होईपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक ४-अ वर लागणाऱ्या सर्व डहाणू लोकल्स प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर लावण्यात याव्यात, अशी ठाम मागणी प्रवाशांकडून होत आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखकर होईल आणि रेल्वेच्या कामातही कोणताही अडथळा येणार नाही.
या संदर्भात डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था यांच्या वतीने
🔹 डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (DRM), प. रेल्वे, मुंबई सेंट्रल
🔹 महाव्यवस्थापक (GM), प. रेल्वे, चर्चगेट
🔹 केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव
🔹 पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सावरा
यांना निवेदन देऊन तातडीने लक्ष वेधण्यात आले आहे.
आता तरी रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्वरित निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनावरच राहील, असा संतप्त सूर प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button