Uncategorized

RTI मुळे वास्तव उघड – प्रवाशांचे हाल, यंत्रणांची बेजबाबदारी!

RTI मुळे वास्तव उघड – प्रवाशांचे हाल, यंत्रणांची बेजबाबदारी!
केळवे रोड | प्रतिनिधी
डहाणू–वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री. हितेश सावे यांनी केळवे रोडसह इतर उपनगरी रेल्वे स्थानकांवरील लिफ्ट व एस्केलेटर सुविधांबाबत माहिती अधिकार (RTI) अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना रेल्वे प्रशासनाकडून एकाही ठोस तारखेचा उल्लेख नसलेली उत्तरे देण्यात आली आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या दैनंदिन अडचणींबाबत प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
सध्या बहुतांश स्थानकांच्या पूर्व बाजूस उभारण्यात आलेले लांबच लांब व उंच झिगझॅग पादचारी पूल हे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, रुग्ण तसेच रोजच्या प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहेत. लिफ्ट व एस्केलेटरसारख्या मूलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
ही समस्या नवीन नसून याच कारणामुळे यापूर्वी सफाळे रेल्वे स्थानकावर उपोषणासह आंदोलन झाले होते. त्यानंतर पश्चिम रेल्वे प्रशासनाला दखल घ्यावी लागली आणि तेथे लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र सफाळे येथून घेतलेला धडा इतर स्थानकांवर का लागू केला जात नाही, असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहेत. सर्व स्थानकांवर समान पद्धतीने या सुविधा का राबवल्या जात नाहीत, हा देखील प्रश्न अनुत्तरित आहे.
सध्याची परिस्थिती अशी आहे की लिफ्ट व एस्केलेटरसारख्या मूलभूत सुविधा पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण (MRVC) यांच्या आपापसातील जबाबदारी टाळण्यामुळे अडकून पडल्या आहेत. एकमेकांकडे बोट दाखवले जात असून त्याचा त्रास मात्र सामान्य प्रवाशांनाच सहन करावा लागत आहे.
डहाणू–वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने हे मान्य केले आहे की लिफ्ट व एस्केलेटर सुविधा MUTP–3 प्रकल्पाचा भाग असून हा प्रकल्प MRVC मार्फत राबवला जात आहे आणि टप्प्याटप्प्याने सुविधा उपलब्ध होतील. मात्र प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता कामांचा प्राधान्यक्रम बदलणे शक्य असून तो बदलला गेला पाहिजे, अशी ठाम भूमिका संस्थेने मांडली आहे.
दरम्यान, केळवे रोड रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेवरील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थानक असतानाही येथे मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याचे स्थानिक प्रवाशांचे म्हणणे आहे. पूर्व-पश्चिम ये-जा करताना प्रचंड गैरसोय होत असून उंच झिगझॅग पादचारी पुलालगत लिफ्टची अत्यंत गरज आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून केळवे रोड स्थानकातील MRVC च्या चौपदरीकरण अंतर्गत सुरू असलेली कामे अत्यंत संथगतीने सुरू असून नव्याने उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे कामही संथपणे सुरू असल्याचे चित्र आहे.
डहाणू–वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या ठाम मागण्या :
पश्चिम रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण यांनी आपापली जबाबदारी स्पष्ट करावी.
प्रत्येक स्थानकासाठी लिफ्ट व एस्केलेटर सुविधांचे ठोस व लेखी वेळापत्रक जाहीर करावे.
प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित टाइमलाइन देऊन नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी.
प्रवाशांचा संयम आता संपत चालला असून ही केवळ मागणी नसून प्रवाशांचा हक्क आहे, असे मत संस्थेने व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button