Uncategorized

तलासरी महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मानसिक ताणतणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन

तलासरी महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मानसिक ताणतणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन


तलासरी (प्रतिनिधी):
महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्षभर विविध जबाबदाऱ्या पार पाडताना मानसिक व शारीरिक ताणतणाव अनुभवत असतात. या पार्श्वभूमीवर तलासरी महाविद्यालयात मानसिक ताणतणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या संकल्पनेतून आणि श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी उमरगाव येथील श्री. फारूक पेणवाला व तलासरी येथील श्री. संजय गोसावी यांनी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
श्री. फारूक पेणवाला यांनी नियमित ध्यान, प्राणायाम, योग व सकारात्मक जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व विशद केले. अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती यांसारख्या प्राणायामामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळून रक्तदाब संतुलित राहतो व मानसिक चिडचिड कमी होते, असे त्यांनी सांगितले. तसेच वेळेचे योग्य नियोजन, कामांचे प्राधान्यक्रम ठरवणे व टीमवर्क वाढविल्यास कामाचा ताण कमी करता येतो, असेही त्यांनी नमूद केले.
यानंतर श्री. संजय गोसावी यांनी शिक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ताणतणावाशी संबंधित शंकांचे निरसन करत दैनंदिन कामकाजात विविध भूमिका पार पाडताना मानसिक व शारीरिक समतोल राखण्याचे महत्त्व उदाहरणांसह स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी सततच्या कामाच्या ओझ्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणारी उदासीनता दूर करण्यासाठी ताणमुक्ती कार्यशाळा, योग-ध्यान शिबिरे, समुपदेशन सेवा व कर्मचारी कल्याण कार्यक्रम नियमितपणे राबविण्याची गरज व्यक्त केली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. अनिल गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button