पालघर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आमदार राजेंद्र गावित यांचे साकडे

पालघर जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे आमदार राजेंद्र गावित यांचे साकडे
पालघर, दि. ५ मार्च (एच. लोखंडे)
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील ढासळती आरोग्य सेवा तसेच रखडलेली रुग्णालयांची बांधकामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, यासाठी आमदार राजेंद्र गावित यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथील “सुरूची” या शासकीय निवासस्थानी ४ मार्च २०२६ रोजी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत पालघर जिल्हा रुग्णालय, मनोर ग्रामीण रुग्णालय तसेच ट्रामा केअर सेंटरच्या इमारतींची सद्यस्थिती, अपूर्ण बांधकामे, आवश्यक सेवक पदभरती, वैद्यकीय उपकरणे, फर्निचर, इलेक्ट्रिफिकेशन आणि निधी उपलब्धतेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
राज्यातील दुर्गम व आदिवासी भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले. पालघर जिल्ह्यातील वाढते औद्योगिकीकरण आणि प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पामुळे वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य सुविधा सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पालघर जिल्हा रुग्णालय व मनोर ग्रामीण रुग्णालयाची अपूर्ण कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येतील. तसेच १ मे २०२६ रोजी लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत या दोन्ही सुसज्ज रुग्णालयांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या बैठकीस पालघर जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
या दोन सुसज्ज होत असलेल्या रुग्णालयांच्या लोकार्पणानंतर स्थानिक नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
सौजन्य : प्रविण घोगारी