Uncategorized

जेएनपीएचा ऐतिहासिक विक्रम : 8 दशलक्ष TEU पार, 100 दशलक्ष टन माल हाताळणीची नोंद

जेएनपीएचा ऐतिहासिक विक्रम : 8 दशलक्ष TEU पार, 100 दशलक्ष टन माल हाताळणीची नोंद


मुंबई(प्रतिनिधी), दि. 26 मार्च 2026 : भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) ने आर्थिक वर्ष 2025–26 मध्ये अभूतपूर्व कामगिरी करत 8 दशलक्ष TEU (ट्वेंटी-फूट इक्विव्हॅलेंट युनिट्स) कंटेनर हाताळणीचा टप्पा पार केला आहे. याचबरोबर, बंदराने स्थापनेपासूनचा सर्वोच्च विक्रम नोंदवत एकूण 100 दशलक्ष मेट्रिक टन (MMT) माल हाताळणी साध्य केली आहे.
या उल्लेखनीय यशानिमित्त जेएनपीएने टर्मिनल ऑपरेटर व इतर भागधारकांसोबत विशेष बैठक आयोजित केली. या बैठकीत बंदराच्या सातत्यपूर्ण प्रगतीमागे सर्व घटकांमधील समन्वय आणि सहकार्य हेच मुख्य कारण असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
जेएनपीएचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. गौरव दयाल यांनी यावेळी सांगितले की, “8 दशलक्ष TEU आणि 100 MMT ही दुहेरी कामगिरी ही संपूर्ण व्यापार समुदायासाठी अभिमानाची बाब आहे. टर्मिनल ऑपरेटर, कर्मचारी आणि सर्व भागधारकांच्या मेहनतीमुळेच हा विक्रम शक्य झाला आहे. भविष्यात पायाभूत सुविधा अधिक मजबूत करून भारताला जागतिक सागरी केंद्र बनविण्याच्या दिशेने आम्ही कटिबद्ध आहोत.”
जेएनपीएचे वाहतूक स्वरूप प्रामुख्याने गेटवे-आधारित असून देशातील कार्गो हाताळणीत त्याची प्रमुख भूमिका कायम आहे. त्याचबरोबर ट्रान्सशिपमेंटमध्येही हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
वाढत्या व्यापारी गरजांची पूर्तता करण्यासाठी जेएनपीएतर्फे पायाभूत सुविधा विकास, डिजिटल परिवर्तन आणि कार्यक्षमतेत वाढ यावर भर दिला जात आहे. बंदरात सध्या विविध कंटेनर टर्मिनल्स कार्यरत असून निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) देखील विकसित करण्यात आले आहे.
याशिवाय, वाढवण येथे सर्व-हवामान, डीप ड्राफ्ट ग्रीनफिल्ड बंदर उभारण्याचे काम सुरू असून, हे बंदर भविष्यात भारतातील प्रमुख आणि जागतिक स्तरावरील अत्याधुनिक बंदरांमध्ये गणले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button