पुरातन मंदिरे देखील आता सुरक्षित नाहीत? नवी मुंबईत स्थानिक भूमिपुत्रांची आक्रमक भूमिका


पुरातन मंदिरे देखील आता सुरक्षित नाहीत? नवी मुंबईत स्थानिक भूमिपुत्रांची आक्रमक भूमिका
मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील | दि. २५ फेब्रुवारी २०२६
नवी मुंबई परिसरातील विलासिनी मंदिराच्या अस्तित्वाच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून स्थानिक भूमिपुत्रांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज झालेल्या बैठकीत मंदिराच्या मूळ जागेबाबत स्थानिक प्रतिनिधी आणि अदानी समूह यांच्यात तीव्र मतभेद उघड झाले.
आज दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीस विलासिनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री नारायण गणपत रानकर, माजी परिवहन सभापती दिलीप म्हात्रे, घणसोली गावकीचे अध्यक्ष बाबूराव पाटील, माजी अध्यक्ष गावकी सिताराम मढवी, तसेच रानकर कुटुंबातील चेतन रानकर, सचिन रानकर, स्थानिक व्यावसायिक शाम पाटील आणि गणेश म्हात्रे उपस्थित होते.
अदानी समूहाकडून जमीन विभागाचे अनीष विश्वकर्मा, मुख्य सुरक्षा रक्षक करण आणि इतर चार सदस्य बैठकीस उपस्थित होते. काल झालेल्या आंदोलनात मांडण्यात आलेले मुद्दे बैठकीत अधिकृतपणे अदानी प्रतिनिधींसमोर ठेवण्यात आले.
बैठकीत स्थानिकांकडून पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:
मूळ भूमीवरील विलासिनी मंदिर जिथे आहे तिथेच कायम ठेवावे.
भक्तांसाठी मंदिराकडे जाणारा रस्ता कायम खुला ठेवावा.
गरजेनुसार भाविकांना पूजा-अर्चेसाठी निर्बंधाविना प्रवेश द्यावा.
मंदिराच्या सुरक्षा दाराची चावी भाविकांना विलंब न करता उपलब्ध करून द्यावी.
मंदिरासमोरील ६० x ७० फूट शेड पाडण्यामागील कारण स्पष्ट करावे.
या सर्व मागण्यांवर अदानी प्रतिनिधींनी उत्तर देताना मंदिरासाठी पर्यायी जमीन देण्याची तयारी दर्शवली. तसेच नवीन मंदिर बांधून देण्याची ऑफर दिली. मात्र मूळ ठिकाणी मंदिर कायम ठेवणे शक्य नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
यावेळी अदानी टीमने २०२२ मधील एका रानकर सदस्याशी झालेल्या व्हॉट्सअॅप चर्चेचा उल्लेख करत पूर्वी सहमती झाल्याचा दावा केला. त्यावर स्थानिक प्रतिनिधींनी आक्षेप घेत, “केमिकल कंपनी स्टँडर्ड अल्कलीने हे मंदिर ४५ वर्षे जतन केले, तर अदानी मूळ मंदिर का ठेवू शकत नाही?” असा थेट सवाल उपस्थित केला.
या प्रश्नानंतर वातावरण तणावपूर्ण झाले आणि बैठक मध्येच थांबवण्यात आली. अदानी प्रतिनिधींनी मूळ विलासिनी मंदिर त्या जागी ठेवणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट करत जुन्या मंदिरातील मूर्ती हलविण्याचा इशारा दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
बैठक निष्फळ ठरल्यानंतर विलासिनी देवस्थानच्या वतीने अध्यक्ष श्री नारायण गणपत रानकर यांनी सांगितले की, “अदानीकडून मिळालेले उत्तर अविश्वसनीय आहे. मंदिराच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्यास कायदेशीर लढा दिला जाईल. भाविकांनी पुढील बैठकीसाठी सज्ज राहावे.”
दरम्यान, या प्रकरणामुळे नवी मुंबई परिसरात धार्मिक भावना आणि विकास यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.