जनतेच्या जीवाशी खेळ! गुजरातमध्ये नकली दुधाचा धक्कादायक घोटाळा उघड

जनतेच्या जीवाशी खेळ! गुजरातमध्ये नकली दुधाचा धक्कादायक घोटाळा उघड
मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)
गुजरातमध्ये अन्न सुरक्षेला काळीमा फासणारा आणि थेट जनतेच्या जीवाशी खेळ करणारा एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे. एका खासगी फॅक्टरीमध्ये तब्बल युरिया आणि डिटर्जंट पावडरचा वापर करून भेसळयुक्त व विषारी दूध तयार केले जात असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा बेकायदेशीर काळा धंदा गेल्या पाच वर्षांपासून निर्घृणपणे सुरू होता.
केवळ नफा कमावण्याच्या हव्यासापोटी या फॅक्टरीत दूधामध्ये युरिया, डिटर्जंटसारखी घातक रसायने मिसळली जात होती. हे दूध बाजारात विक्रीसाठी सोडले जात असून, ते सेवन केल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे अन्न सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर चालणारा गैरप्रकार इतकी वर्षे सुरू असताना संबंधित अन्न व औषध प्रशासन, तपास यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन नेमके काय करत होते, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
हा केवळ प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे की यामागे काही भ्रष्ट अधिकारी किंवा राजकीय पाठबळ आहे, याचाही सखोल तपास होणे गरजेचे आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गुन्हेगारांवर गेल्या पाच वर्षांत कारवाई का झाली नाही, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा विषारी दूधाचे सेवन केल्यास किडनी, यकृत, पोटाचे गंभीर आजार, तसेच दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींसाठी हे दूध अत्यंत घातक ठरू शकते.
लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या नराधमांना आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या भ्रष्ट घटकांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी जोरदार मागणी होत आहे. हा प्रकार केवळ गुजरातपुरताच मर्यादित आहे की आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्येही अशाच प्रकारचे धंदे सुरू आहेत, याचाही सखोल तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.