मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हाभरात वनराई बंधारे उभारण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन


मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हाभरात वनराई बंधारे उभारण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन
पालघर (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाभरात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे उभारण्यात यावेत, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आज आढावा सभेत केले.
वनराई बंधारे उभारणी ही केवळ औपचारिक बाब न राहता, जलसाठा निर्माण करणारी, वास्तव व उपयोगी ठरणारी असावी, असे नमूद करून त्यांनी सांगितले की, या माध्यमातून जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करता येईल व शाश्वत जलसंधारण साध्य होईल. यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी पुढाकार घ्यावा तसेच अधिकारी, कर्मचारी, महिला, स्वयंसेवी गट यांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
जलजीवन मिशन, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग (सर्व शिक्षा अभियान), कॅनल बांधकाम व लघुपाटबंधारे विभाग यांनी वनराई बंधाऱ्यांसाठी आवश्यक गोण्या व साहित्य उपलब्ध करून द्यावे, तसेच संघटनात्मक पातळीवर विभागांतर्गत सर्व संवर्गांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे निर्देश देण्यात आले. जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर समन्वयातून वनराई बंधारे उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.
स्वयं-सहायता समूहांच्या महिलांनी, अंगणवाडी सेविका व आशा सेविकांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. उत्कृष्ट व उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा योग्य सत्कार करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वनराई बंधारे उभारणी हे एक मिशन असून ते मिशन मोडमध्येच राबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही वनराई बंधारे उभारणीस सर्वोच्च प्राधान्य देऊन विभागीय समन्वयातून भरीव व परिणामकारक काम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
अभियानात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, स्वयंसेवी संस्था (NGO), ग्रामस्थ व शेतकरी यांना सक्रिय सहभागी करून घ्यावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी केले. विशेषतः ज्या शेतकऱ्यांच्या शेतीलगत नाले आहेत, त्या ठिकाणी वनराई बंधारे बांधल्यास दोन ते तीन महिन्यांपर्यंत पाण्याची उपलब्धता होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीस प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) इजाज अहमद शरीकमसलत,सर्व विभागप्रमुख तसेच गटविकास अधिकारी उपस्थित होते.