मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्थसंकल्प समजण्यासाठी मार्गदर्शक पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अर्थसंकल्प समजण्यासाठी मार्गदर्शक पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
देवेंद्र फडणवीस येत्या ६ मार्च रोजी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री म्हणून वर्ष २०२६–२०२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सर्वसामान्यांना सहज समजावा या उद्देशाने त्यांनी लिहिलेले ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे मार्गदर्शक पुस्तक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
राज्याच्या आर्थिक धोरणांचा आराखडा असलेला अर्थसंकल्प सामान्य वाचकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचावा, यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. ४ मार्च २०२० रोजी नागपूर येथील लाखे प्रकाशन यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. तेव्हापासून अर्थसंकल्प समजावून सांगणारे उपयुक्त मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाची ओळख निर्माण झाली आहे.
या पुस्तकात ‘बजेट’ शब्दाची उत्पत्ती, अर्थसंकल्प समजण्यापूर्वी आवश्यक बाबी, तसेच अर्थसंकल्पाशी संबंधित संज्ञांचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मराठी व इंग्रजी शब्दप्रयोगांची तुलना, भारतीय संविधानातील संबंधित तरतुदी, अर्थसंकल्पाची रचना, तयार होण्याची प्रक्रिया आणि मंजुरीची पायरीवार माहितीही समाविष्ट करण्यात आली आहे.
पांढऱ्या मुखपृष्ठाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक (व्हाईट बुक) तसेच ग्रीन बुकमधील तरतुदींचे सोप्या भाषेत विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. विभागनिहाय व विकास मंडळनिहाय अनिवार्य विकास खर्चाची माहिती दिली असून, राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७१(२)(ब) नुसार प्रादेशिक अनुशेष निर्मूलनासाठी सादर होणाऱ्या अनुपालन आदेशाचाही ऊहापोह करण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर करणे, मंजूर करणे आणि त्याचे कायद्यात रूपांतर होणे या टप्प्यांचेही सविस्तर स्पष्टीकरण पुस्तकात आहे.
‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तक https://www.devendrafadnavis.in/budget_2020� या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाने केले आहे.