Uncategorized

मायखोप गावातील प्रवेशद्वाराचे लोकार्पण उत्साहात

मायखोप गावातील प्रवेशद्वाराचे लोकार्पण उत्साहात
केळवे रोड, दि. १ (प्रतिनिधी):
मायखोप गावातील मुख्य रस्त्यावरील नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले. कै. रामचंद्र चिंतू पाटील (नाना) यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या प्रवेशद्वाराचे उद्घाटन त्यांची नात प्राश्वी देवेंद्र पाटील व गावातील कन्यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रवेशद्वाराच्या उभारणीसाठी सर्वस्व अर्पण करणारे हितेंद्र पाटील, देवेंद्र पाटील, कवी महेंद्र पाटील तसेच नानांच्या पत्नी रंजनी पाटील यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमांपासून इतर गावांनीही प्रेरणा घ्यावी, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.
उद्घाटन सोहळ्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बहुसंख्य आगरी समाजबांधवांनी उपस्थिती लावली. अनेकांनी कै. नाना यांच्याविषयीच्या गोड आठवणींना उजाळा दिला.
राजन घरत यांच्या भावनिक भाषणाने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला असून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
कार्यक्रमास राजन घरत, रामदास पाटील, अनिल पाटील, योगेश पाटील, जगदीश किणीसर, महेंद्र पाटील सर, लेखक संजय पाटील मायखोपकर, डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्था सचिव दयानंद पाटील, सरपंच महेंद्र किणी, ग्रामविकास अधिकारी संतोष पाटील, मंगेश पडीत, उद्योजक मनोहर मंहते यांच्यासह अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी कै. रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ कुटुंबाच्या वतीने कवी महेंद्र पाटील यांनी दरवर्षी मराठी गौरव दिनी समाजातील एका साहित्यिक, कवी किंवा लेखकाला ‘कै. रामचंद्र पाटील स्मृती पुरस्कार’ देण्यात येईल, अशी घोषणा केली.
या वर्षीचा पुरस्कार साहित्यिक, कवी व सहसंपादक संजय पाटील मायखोपकर यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र घरत सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भावनिक वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button