आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारीपासून

आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारीपासून
मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील
कोकणातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित झाली आहे. देवीचा कौल घेऊन ९ फेब्रुवारी २०२६ रोजी भराडी देवीची यात्रा सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. साधारण दीड दिवस चालणारी ही यात्रा कोकणातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेच्या यात्रांपैकी एक मानली जाते.
तिथीवर नव्हे, देवीच्या कौलावर यात्रा
आंगणेवाडीच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा कोणत्याही पंचांगातील तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेतल्यानंतरच यात्रेचा दिवस निश्चित केला जातो. आज सकाळी देवीचा कौल घेऊन यंदाच्या यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली.
लाखो भाविकांची उपस्थिती
दरवर्षी देशभरातून सुमारे ५ ते ७ लाख भाविक केवळ दीड दिवसांच्या या यात्रेत सहभागी होतात. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, मान्यवर तसेच भाविक मोठ्या संख्येने भराडी देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात. यात्रेची तारीख जाहीर होताच रेल्वे, एसटी व खासगी वाहनांच्या बुकिंगसाठी चढाओढ सुरू झाली आहे.
नवसाला पावणारी भराडी देवी
मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे भराडी देवीचे मंदिर आहे. भरड म्हणजे माळरान. देवी माळरानावर प्रकट झाल्याने तिला भराडी देवी असे नाव पडले. आंगणेवाडी ही वाडी आंगणे कुटुंबियांची असून मंदिर खाजगी असल्याचा उल्लेख फलकावर असला तरी, नवसाला पावणारी देवी म्हणून सर्व भाविकांसाठी दर्शन खुले असते. गाऱ्हाणे व नवस बोलून अनेक भाविक येथे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी दर्शन घेतात.
नैवेद्य व धार्मिक परंपरा
भराडी देवीचा नैवेद्य हे यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आंगणे कुटुंबातील माहेरवाशिणी अबोल राहून हा नैवेद्य करतात. यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला या प्रसादाचा लाभ दिला जातो. यासाठी आंगणेवाडीतील महिला मोठ्या प्रमाणावर प्रसाद तयार करतात.
सांस्कृतिक सोहळ्यांची रेलचेल
धार्मिकतेसोबतच यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रमांचाही समावेश असतो. आंगणे ग्रामस्थांचे मांडावरचे नाटक, मिरज येथील गोंधळींचा गोंधळ, दशावतार असे विविध पारंपरिक कार्यक्रम यात्रेचे आकर्षण ठरतात.
आंगणेवाडीला कसे जाल?
कणकवली व कुडाळ रेल्वे स्थानकांवरून बस डेपोपर्यंत शेअर रिक्षाची सोय उपलब्ध आहे. येथून आंगणेवाडीला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने एसटी बसेस उपलब्ध असून तिकीट दर माफक ठेवण्यात आले आहेत. खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरून कुडाळ, कसाल, कणकवली मार्गे आंगणेवाडीला जाता येते.