राष्ट्रीय वेबिनार: शिक्षण, संशोधन व उद्योगक्षेत्रात AI ची भूमिका



राष्ट्रीय वेबिनार: शिक्षण, संशोधन व उद्योगक्षेत्रात AI ची भूमिका
तलासरी (प्रतिनिधी) : आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तलासरी (जि. पालघर) आणि विद्या विकास मंडळ पाथरूड संचालित शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम (जि. धाराशिव) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी “Fundamental Research, IPR and Industrial Application and Integrating Generative AI in Education” या विषयावर राष्ट्रीय वेबिनार ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरित्या पार पडला.
या वेबिनारचे आयोजन दोन्ही महाविद्यालयांच्या गणित व रसायनशास्त्र विभागामार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमास विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बी. ए. राजपूत (प्राचार्य, कॉ. जी.एस. पी. महाविद्यालय, तलासरी) व डॉ. ए. एस. जगदाळे (प्राचार्य, शंकरराव पाटील महाविद्यालय, भूम) उपस्थित होते.
वेबिनार तीन सत्रांमध्ये पार पडला.
पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते डॉ. सत्यनारायण अरडे (सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणा नगर) यांनी मूलभूत संशोधन व आयपीआरचे औद्योगिक उपयोग याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात डॉ. अनंता गाडे (सहाय्यक प्राध्यापक, गणित विभाग, एम.एस.पी. मंडळाचे राजमाता जिजाऊ महाविद्यालय, किल्ले धारूर) यांनी शिक्षणामध्ये जनरेटिव्ह एआयचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले.
तिसऱ्या सत्रात डॉ. गजानन ए. बोडखे (आंतरराष्ट्रीय संशोधन प्राध्यापक, अन्न विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, यॉंगनाम विद्यापीठ, दक्षिण कोरिया) यांनी अन्न विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात एआयचा वापर कसा होत आहे याची माहिती दिली.
वेबिनारमध्ये संशोधन क्षेत्रातील संधी, पेटंट प्रक्रियेचे महत्त्व तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अध्यापन प्रक्रियेत समावेश यावर सविस्तर चर्चा झाली. या वेबिनारसाठी एकूण ३७४ जणांनी नोंदणी केली होती.
वेबिनारचे सूत्रसंचालन डॉ. जे. डी. मेश्राम यांनी केले, तर कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक प्राध्यापक अमोल दबडे यांनी मांडली. कार्यक्रमातील वक्त्यांची ओळख सहाय्यक प्राध्यापक बाळू लव्हारे यांनी करून दिली. कार्यक्रमासाठी सहाय्यक प्राध्यापक अक्षय डोंगरदिवे, डॉ. वैभव माने व सहाय्यक प्राध्यापक ए. एम. कुटे यांचे सहकार्य लाभले.