कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात पालक-शिक्षक- विद्यार्थी सहविचार सभा संपन्न


कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालयात पालक-शिक्षक- विद्यार्थी सहविचार सभा संपन्न
तलासरी, दि. ५ मार्च २०२६ :
आदिवासी प्रगती मंडळ संचलित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, तलासरी येथे द्वितीय व तृतीय वर्ष कला (SYBA/TYBA) शाखेच्या विद्यार्थ्यांची पालक-शिक्षक-विद्यार्थी सहविचार सभा उत्साहात पार पडली. ही सभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मोहनभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेत विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी, शैक्षणिक प्रगती आणि भविष्यातील संधी यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. गोतीस सर यांनी स्वागतपर भाषणात महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा, तसेच विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध वर्तनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर. एन. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये महाविद्यालय आणि पालक या दोघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावेत आणि स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे (NEP) महत्त्व आणि त्यामागील उद्देश यावरही त्यांनी सविस्तर भाष्य केले.
परीक्षेसाठी अल्प कालावधी शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांनी या काळात जिद्दीने अभ्यासाला लागावे, दररोज नियमित अभ्यास करून अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घ्यावेत, असे आवाहन प्राचार्यांनी केले. मोबाईल व मनोरंजनाच्या मोहात न पडता त्याचा योग्य आणि मर्यादित वापर करावा, तसेच अभ्यासालाच सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकांनाही मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या आहाराची, अभ्यासाची आणि मानसिक बळाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी दररोज व्यायाम करणेही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी जिद्दीने आणि प्रामाणिकपणे अभ्यास करावा, असे प्रेरणादायी प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजपूत यांनी केले.
महाविद्यालयाने राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे पालकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनी प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करावा, तसेच नैतिक मूल्यांचे पालन करावे, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली.
या सभेमुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत झाली. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.