उडान महोत्सव दांडेकर महाविद्यालयात उत्साहात संपन्नअभ्यासक्रमाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा – डॉ. बळीराम गायकवाड

उडान महोत्सव दांडेकर महाविद्यालयात उत्साहात संपन्न
अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा – डॉ. बळीराम गायकवाड
पालघर (प्रतिनिधी) –
“अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन जीवनाचा अर्थ शोधला पाहिजे. जीवनातील अनुभव सर्वांत महत्त्वाचा असतो. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक गोष्टी विसरल्या जातात; मात्र अनुभव कधीही विसरला जात नाही. हा अनुभव देण्याचे महत्त्वाचे कार्य आजीवन शिक्षण व विस्तार विभाग करीत आहे,” असे प्रतिपादन प्रा. डॉ. बळीराम गायकवाड यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभाग व सोनोपंत दांडेकर कला, वा. श्री. आपटे वाणिज्य व एम.एच. मेहता विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उडान : द फ्लाइट ऑफ एक्सटेन्शन २०२६” या वार्षिक आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. बळीराम गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेचे कोषाध्यक्ष मंगेश पंडित यांनी उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आजीवन शिक्षण हे समाजाशी नाळ जोडणारे असून ते आयुष्यभर सुरू असते. केवळ परीक्षेतील गुणांवर भवितव्य ठरत नाही. विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने जपली पाहिजेत व त्यासाठी विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.”
या महोत्सवात पथनाट्य, पोस्टर मेकिंग, पोवाडा, सर्जनशील लेखन व वकृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण २२ महाविद्यालयांतील ३५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धांमध्ये सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले. वकृत्व व पोस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर पथनाट्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवित महाविद्यालयाने दोन सुवर्णपदके व एक कांस्य पदक पटकावले.
या प्रसंगी डॉ. कुणाल जाधव, उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ, डॉ. महेश देशमुख तसेच विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत मोगले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दर्शना चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दक्षता पाटील व डॉ. वैभवा मोरे यांनी केले.
सदर आंतरमहाविद्यालयीन महोत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ. प्रशांत मोगले, डॉ. दक्षता पाटील, डॉ. दर्शना चौधरी, डॉ. वैभवा मोरे, डॉ. पूजा केणी व प्रा. रुद्राक्षी राऊत यांनी विशेष मेहनत घेतली. यासाठी प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख व डॉ. तानाजी पोळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.